You are currently viewing तहसीलदार कार्यालयाच्या ड्रेनेजचे सांडपाणी भूमी अभिलेख कार्यालयाच्या दारात

तहसीलदार कार्यालयाच्या ड्रेनेजचे सांडपाणी भूमी अभिलेख कार्यालयाच्या दारात

स्वच्छतेचे महत्त्व फक्त सामान्य नागरिकांसाठीच का?

आपला परिसर स्वच्छ ठेवा रोगराई दूर पळवा… शहर स्वच्छतेचे महत्व आणि स्वच्छतेचे एका पेक्षा एक सरस नारे देणाऱ्या सरकारी यंत्रणेला स्वतःचाच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी उपदेश तरी कोणी करायचा? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. सावंतवाडी तहसील कार्यालयाची इमारत बांधून वर्ष दीड वर्ष होते न होते तोच तहसील कार्यालयाच्या टॉयलेटचे सांडपाणी तहसीलदार कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या भूमिअभिलेख इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर येऊन ते भूमी अभिलेख कार्यालयाच्या दारात जात आहे. सर्वसामान्य नागरिक भूमीअभिलेख कार्यालयात जाताना तहसील कार्यालयातील सांडपाण्यातूनच मार्ग काढत जात आहेत. त्यामुळे पाण्यातून जाणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडात स्वच्छता ही केवळ सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहे का? असा प्रश्न येत आहे. सावंतवाडी नगरपालिका स्वच्छतेचे बक्षीस मिळविण्यासाठी व शहर स्वच्छ दुर्गंधी मुक्त, डास मुक्त ठेवण्यासाठी नागरिकांना आवाहन करून शहर स्वच्छतेसाठी आटोकाट प्रयत्न करत असताना, सावंतवाडी तालुक्याचे प्रमुख समजले जाणाऱ्या तहसील कार्यालयाच्या आवारात जर दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर येत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी नक्की स्वच्छतेची अपेक्षा करावी ती कोणाकडून? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या घरातील सांडपाणी रस्त्यावर आल्यास नगरपालिका त्यावर दंडात्मक कारवाई करते परंतु रस्ता तहसील कार्यालयाच्या आवारातील असला तरी, रस्ता जनतेच्या सोयीसाठी व सुविधांसाठी बनविलेला आहे. अशा रस्त्यावर तहसील कार्यालयातील पाणी येत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तहसील कार्यालयाकडून लवकरात लवकर यावर उपाययोजना करावी अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा