जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ.सुमती पवार यांचा अप्रतिम लेख
वाट .. रस्ता..सडक……आणि लक्ष .. होय जीवनाला एक लक्ष..ध्येय..उद्दिष्ट…
असतं ..नव्हे, असावंच…!
नाही तर प्रवाहाबरोबर वाहत जाऊन जीवनाची वाताहत होण्याची शक्यताच जास्त …म्हणून जीवनात ही वाट अत्यंत
महत्वाची.. ती ही सरळ नकोच… हो, मग किती कंटाळवाणं
होईल आयुष्य…? म्हणून ती वळणावरची..वळणावळणाची
खाच खळग्यांची, आव्हानात्मक असेल तर …! झगडा द्यावा
लागतो, त्रास होतो, पण नंतर यश मिळाल्यावर जो अननुभूत
आनंद मिळतो, त्याची सर कशाला ही येत नाही. मी जिंकलो,
यशस्वी झालो असे गर्वाने छाती फुगवत आपण सांगत सुटतो..
खरं तर … अगदी सरळसोट, वळणं नसलेली वाट फार कमी
लोकांच्या वाट्याला येत असावी.. किंबहुना नाहीच..आयुष्यात
झगडा द्यावा लागला नाही असे किती बरे लोक असतील ?
जवळ जवळ नाहीच? जी गोष्ट खूप खटपट करून मिळते तिचे
कौतुक खूप असते व आनंद ही मोठा असतो. हो, हे मी केले हो ! खूप त्रास झाला पण जिंकलो एकदाचा…सांगणाऱ्याच्या
चेहऱ्यावरून आनंद अगदी ओसांडत असतो.
जगातले जे जे महान लोक आहेत त्यांचे जीवन चरित्र अभ्यासले म्हणजे कळते, किती कष्टातून ही मंडळी उभी
राहिली आहे.. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन फार कमी लोक
जन्माला येतात …बहुतेकांची वाट ही वळणावरचीच असते.
जीवनाला अशी काही कलाटणी मिळते की बघतच रहावे …
अंबानी ( धीरूभाई) पेट्रोल पंपावर काम करत होते ..
आज किती तरी पेट्रोल कंपन्यांचे मालक त्यांची मुले आहेत .
व्यापारात प्रचंड हुशारीने त्यांनी काम केले नि अपार यश मिळविले.आजच्या आघाडी वरच्या सर्व श्रीमंतांची हीच कथा
आहे.वेड्या वाकड्या वळणाच्या काटेरी वाटांवरून चालत,
प्रसंगी रक्तबंबाळ होत अपयश पचवत,खाचखळगे व त्यावर उड्या मारत त्यांनी जीवनाला यशस्वीपणे तोंड दिले व यश
खेचून आणले.
वळणाच्या वाटेवरती असे अनेक उद्योजक आहेत . ह्या सर्व
लोकांनी रस्त्यावर कापड विकण्यापासून काही ही काम केले आहे. कामाची कधी ही लाज नसावी. लाज असावी ती
भ्रष्टाचाराची व लाचखोरीची .. पण त्याची लाज न वाटता
आपल्याला कष्टाची लाज वाटते … आणि हेच अपयशाचे
कारण आहे .वळणाच्या वाटेवर जी जी आव्हाने येतात ती
स्वीकारत त्या वाटे बरोबरच चालायची सवय करून घेऊन
चालू लागलो तर अशी अवघड वाट ही सोपी होऊन जाते यात
शंकाच नाही. आणि मग अशा अवघड वाटेवरचे सौंदर्य ही मनात भरू लागते. तिच्यावर फुललेली हिरवळ , आजुबाजूच्या
लतावेली त्यावर फुललेली नाजुक फुले दिसू लागतात …
शेवटी …
किती ही कठीण परिस्थितीत आनंदाने जगणे हेच ध्येय ठेवायला हवे ना ..? नाही तर जगण्याला मग अर्थच काय
उरतो …? म्हणून वाट वळणाची असो , सरळ असो, वाकडी
असो..कशी ही असो, निर्धाराने चालावे प्रसंगी दोन हात करून
वाटेलाच आपल्या बरोबर चालायला भाग पाडावे यालाच
म्हणतात पुरूषार्थ …
सर्व यशस्वी पुरूषांनी हा पुरूषार्थ दाखवला म्हणूनच वाकड्या
खाचखळग्याच्या वळणावर ते आज पाय रोवून उभे आहेत …
खेळाडूंच्या बाबतीत तर प्रकर्षाने ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल…तसेच सिनेमा क्षेत्रातील लोक ही याला अपवाद नाहीत ..त्यांना ही प्रचंड संघर्ष करावा लागला आहे, करावा
लागतो …
श्रम प्रतिष्ठा ती हीच बरे मंडळींनो ….
वाट वळणाची वळणाची सुंदर ती बाई
नागमोडी नी फुलांनी बहरून येई
घ्याव्या गिरक्या फिरक्या डुलत चालावे
थोडे थांबून वळणाशी तिच्याशी बोलावे ….
ख्याली खुशाली पुसावी नि मैत्र जमवावे
नाही बदलत वाट आपणच बदलावे
आहे आयुष्य सुखाचे वाट चालावी लागते
वाट चालल्याशिवाय सांगा कुणाचे भागते …
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६९५६४२)
दि : २२ फेब्रुवारी २०२२
वेळ : दुपारी ४ : २४
आणि हो …
ही फक्त माझी मते आहेत …..
॥धन्यवाद ॥