मुंबई येथील अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर यांनी दिला सल्ला
कणकवली
आपल्याकडे ज्ञानार्जन करण्यासाठी पुढे येत नाहीत. मात्र इतर सार्वजनिक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती दिसते. जिल्ह्यातील यशोगाथा वाढल्या पाहिजेत. स्पर्धा परीक्षांमध्ये रस दाखवला पाहिजे असे सांगतानाच अपयश आले तरी डगमगु नका. प्रयत्न करत रहा असा मोलाचा संदेश मुंबई येथील अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर यांनी दिला.
ते येथील मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे ‘शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ या विषयावर आयोजित मार्गदर्शन वर्गात बोलत होते. या कार्यक्रमाची सुरुवात सत्यवान रेडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी सदाशिव पांचाळ, पत्रकार निकेत पावसकर, प्रा. गंगाधर हनवटे, प्रा. प्रशांत हटकर, प्रा. निनाद दानी आदी उपस्थित होते.
यावेळी तिमिरातून तेजाकडे या चळवळीचे प्रणेते सत्यवान रेडकर यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांबाबत माहिती दिली. दहावी, बारावी आणि पदवीनंतर कोणत्या परिक्षा द्यायच्या, त्यासाठी तयारी कशी करायची, अगदी अर्ज भरताना कोणती काळजी घेतली पाहिजे? याबाबतची संपुर्ण माहिती देतानाच उपस्थीत मुलांमध्ये स्पर्धा परिक्षाविषयी नवचैतन्य निर्माण केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुष्का कदम तर आभार मानसी कुडतरकर हिने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.