You are currently viewing सावंतवाडी तहसीलदारांच्या आश्वासनानंतर कारिवडे ग्रामस्थांचे उपोषण मागे…

सावंतवाडी तहसीलदारांच्या आश्वासनानंतर कारिवडे ग्रामस्थांचे उपोषण मागे…

सावंतवाडी

रेशन धान्य दुकानासाठी कारिवडे ग्रामस्थांनी पुकारलेले आंदोलन आज तिसऱ्या दिवशी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. जून-जुलैमध्ये आवश्यक असलेला परवाना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असे श्री म्हात्रे यांनी आश्वासन दिले.त्यामुळे ग्रामस्थांनी माघार घेतली. दरम्यान त्यांच्या आंदोलनाला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी भेट दिली.

यावेळी कारीवडे सरपंचा अपर्णा तळवणेकर, कोलगाव सरपंच संतोष राऊळ, पंचायत समिती उपसभापती शीतल राऊळ, प्राजक्ता केळुसकर, मंगेश तळवणेकर आदिंसह ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते.

दरम्यान कारीवडे ग्रामस्थांचे रेशन धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी २२ फेब्रुवारीपासून उपोषण जिल्हा बँकेचे संचालक तथा भाजप युवा नेते महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन चालू करण्यात आले होते. दरम्यान जोपर्यंत आपल्याला योग्य तो न्याय मिळत नाही, तोपर्यंतआम्ही माघार घेणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला होता. यावेळी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भजन आंदोलन करण्यात आले होते.कारीवडे गावातील ग्रामस्थांना रेशन धान्याचा लाभ घेण्यासाठी कुडाळ-केरवडे जंगल कामगार सहकारी संस्था या ठिकाणी जावे लागते. कारीवडे गाव सावंतवाडी तालुक्यात येत असताना रेशन धान्य दुकान कुडाळ तालुक्यात येत असल्यामुळे आणि त्या ठिकाणी योग्य सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान कारिवडे गावाला कायमस्वरूपी रेशन धान्य दुकान मिळावे, अशी मागणी २०१३ साला पासून ग्रामस्थांकडून होत आहे. त्यासाठी २०१६ पासून पाठपुरावा सुद्धा झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी अखेर आंदोलनाचा पवित्रा हाती घेत उपोषण सुरू केले होते. आज तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा