१२० अश्वशक्ती पेक्षा जास्त इंजिन क्षमतेच्या ट्रॉलरना अनुदानित डिझेल कोटा व थकबाकीही मिळणार
मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचा निर्णय
आमदार वैभव नाईक व शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या पुढाकारातून मालवण व देवगड येथील मच्छीमार शिष्टमंडळासोबत मंत्री अस्लम शेख यांच्या सकारात्मक चर्चेअंती निर्णय
सिंधुदुर्गसह राज्याच्या किनारपट्टीवरील १२० अश्वशक्ती पेक्षा जास्त इंजिन क्षमतेच्या ट्रॉलरना अनुदानित डिझेल कोटा व थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आमदार वैभव नाईक व शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या पुढाकारातून मालवण व देवगड येथील मच्छीमार शिष्टमंडळासोबत मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या सकारात्मक चर्चेअंती १२० अश्वशक्ती इंजिन क्षमता ट्रॉलरना अनुदानित डिझेल कोट्यात समावेश करून त्यांना मागील अनुदानित थकबाकीही दिली जाणार असल्याची ग्वाही मंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. अशी माहिती बैठकीस उपस्थित मच्छीमार प्रतिनिधी संतोष खांदारे यांनी दिली आहे.
यावेळी मालवण देवगड येथील मच्छीमार प्रतिनिधी संतोष खांदारे, जगन्नाथ कोयंडे, कृष्णा परब, धनंजय जोशी, बाबी तेली यासह देवगड नवनिर्वाचित नगरसेवक संतोष तारी हेही उपस्थित होते.
आमदार वैभव नाईक, संदेश पारकर यांच्या समवेत आलेल्या मच्छीमार शिष्टमंडळाशी सविस्तरपणे चर्चा करत मंत्री अस्लम शेख यांनी वस्तुस्थिती जाणून घेतली. जर सहा सिलेंडर क्षमता असलेलेच इंजिन बोटींवर आहे. त्यात कोणतीही वाढ न होता केवळ स्पीड वाढला असेल म्हणून मच्छीमारांवर अन्याय होऊ देणे योग्य नाही. अनुदानित डिझेल कोट्यात अश्या बोटी पुन्हा समाविष्ठ करा. मागील थकीत डिझेल परतावा त्यांना द्या. याबाबत मंत्री अस्लम शेख यांनी अधिकाऱ्यांना सूचित करून याबाबत त्वरित आदेश पत्र तयार करा. असेही अधिकारी वर्गाला सांगितले असल्याचे उपस्थित मच्छीमारानी माहिती देताना सांगितले आहे.
एकूणच मच्छीमारांचे हित लक्षात घेऊन बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्याने मच्छीमारांनी समाधान व्यक्त करत मंत्री अस्लम शेख, आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना नेते संदेश पारकर, देवगड नवनिर्वाचित नगरसेवक संतोष तारी यांचे आभार मानले आहेत.