You are currently viewing वारीमध्ये गेल्यानंतर

वारीमध्ये गेल्यानंतर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री जयश्री जिवाजी कुलकर्णी लिखित अप्रतिम गझल*

 

*वारीमध्ये गेल्यानंतर*

 

आयुष्याचे कोडे सुटले वारीमध्ये गेल्यानंतर

मनातले या वादळ शमले वारीमध्ये गेल्यानंतर

 

असुनी सारे माझ्या जवळी फक्त उणीवा शोधत होतो

रडे कालचे अता संपले वारीमध्ये गेल्यानंतर

 

जीवन आहे हे क्षणभंगुर क्षण आत्ताचा असे आपला

मला एवढे आहे कळले वारीमध्ये गेल्यानंतर

 

महत्त्व इतके मला दिले की बाकीच्यांना तुच्छ समजलो

मी पण तेही गळून पडले वारीमध्ये गेल्यानंतर

 

सुखदुःखाची व्याख्या सुद्धा पूर्णपणाने असे बदलली

आनंदाने हे मन नटले वारीमध्ये गेल्यानंतर

 

भक्तीच्या त्या धारेमध्ये चित्ताची पण शुद्धी झाली

मनातले मी किल्मिष धुतले वारीमध्ये गेल्यानंतर

 

तुझ्या नि माझ्या मध्ये अंतर किंचित सुद्धा नसे विठ्ठला

बिंबाला प्रतिबिंब भेटले वारीमध्ये गेल्यानंतर

 

जयश्री जिवाजी कुलकर्णी

नाशिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − twelve =