क्रिकेटची पारितोषिक आणि खर्च करून मारतात पट
२४ फेब्रुवारी ला पटांच्या सामन्यांचे आयोजन
जिल्ह्यातील जत्रोत्सवा पाठोपाठ प्रत्येक उत्सव, नाटक, आदींच्या आयोजनांबरोबर क्रिकेट सामन्यांच्या आयोजनात देखील अवैध धंदे घुसले आहेत. तरुण मुले बक्षिसांची रक्कम आणि क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी जिथे जिथे स्पर्धा भरतात तिथे खेळण्यासाठी जातात. क्रिकेटचा आनंद घेण्याचे कोवळे वय असताना क्रिकेटच्या आडून स्पर्धा भरवणारे जुगाराच्या मैफिली देखील झाडतात त्यामुळे ही तरुण कोवळी मुले क्रिकेट सोडून जुगाराकडे वळू लागली आहेत.
सावंतवाडी तालुक्यातील स्पर्धांमध्ये सामील होणाऱ्या काही संघांमध्ये जिल्ह्यात दारूच्या व्यवसायात अग्रेसर असणारी “लाडात येणारी” “तुळशीची” “गावकरी” करणारी काळ्या काचा लावलेल्या गाड्या घेऊन फिरणारी मंडळी सामील असतात. स्पर्धेच्या फायनलमध्ये हमखास भांडणे करणारी ही मंडळी अनेक युवकांना जुगाराच्या, दारूच्या अवैद्य धंद्यांमध्ये अडकवत आहेत.
बांदा पोलीस दुरक्षेत्राच्या हद्दीत अडूला, (अ)रमळे येथे येत्या २४ तारीख पासून जुगारी लोकांनीच क्रिकेटची बक्षिसे आणि सामन्यांचे आयोजन पुरस्कृत करून क्रिकेटच्या स्पर्धा भरविल्या जात आहेत. या क्रिकेट स्पर्धांच्या आयोजनांबरोबर बाजूलाच ही जुगारी मंडळी आपले जुगाराचे पाल टाकतात आणि क्रिकेट खेळण्यासाठी आलेली तरुण, युवा पिढी नको त्या फंदात फसतात. एकीकडे क्रिकेट स्पर्धा आहेत असे सांगून घरातून दिवसभर बाहेर असणारी ही मुले क्रिकेट स्पर्धेच्या ठिकाणीच जुगाराकडे वळतात, मोफत मिळणारी बियर पितात त्यामुळे क्रिकेट स्पर्धाच चिंतेचा विषय बनला आहे. अनेकांचे आई-वडील शासकीय, खाजगी नोकरीत असतात, दिवसभर मुले कुठे जातात त्यांना पत्ताच नसतो. अशावेळी क्रिकेटच्या नादात मैदानात पोचणारी ही मुले मैदानाशेजारील झाडाखाली बसणाऱ्या जुगाराच्या जाळ्यात कधी अडकतात आणि पैशांच्या लोभापायी व्यसनाधीन कशी आणि कधी होतात याची साधी कल्पना देखील पालकांना येत नाही.
सावंतवाडी तालुक्यात मळगाव येथे मोफत पोलीस भरती प्रशिक्षण सुरू असून तिथे भरतीसाठी श्रम घेऊन प्रयत्न न करता क्रिकेट सारख्या आयुष्याचा खेळ करणाऱ्या स्पर्धांसाठी तरुण मुले प्रशिक्षणाकडे देखील दुर्लक्ष करतात आणि भविष्याची चिंता न करता क्रिकेटच्या वेडापायी अवैद्य धंदे आणि जुगार दारू सारख्या व्यसनांकडे वळतात. अलीकडेच सुरू झालेले हे *”क्रिकेटच्या आडून जुगाराचे फॅड”* जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेने वेळीच आवाक्यात आणावे अन्यथा नवी पिढी जी आपण भविष्य समजतो ती कधी भूतकाळ बनेल हे सांगता येणार नाही.