*प्रशासकीय स्तरावर विचार करून व्यावसायिकांना सहकार्य केले जाईल असे जिल्हाधिकारी यांचे महासंघास आश्वासन :-श्री विष्णू मोंडकर ,जिल्हाध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग *
ओरोस :
पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांच्या कडे जिल्ह्यातील व्यापारी वर्गाच्या आर्थिक उभारणीसाठी चर्चा करण्यात आली. मार्च २०२० पासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले. तसेच गेली जवळजवळ २ वर्षे कोरोना महामारीमुळे प्रशासनाकडून वेळोवेळी लॉकडाऊन करून व्यवसायावर निर्बंध आणण्यात आले होते.
सिंधुदुर्ग जिल्हा हा प्रामुख्याने मासेमारी, शेती व पर्यटनावर आधारित उद्योगांवर अवलंबून आहे. गेली दोन वर्षे संपूर्ण पर्यटन व्यवसाय ठप्प आहे. त्यापूर्वी झालेल्या नोटबंदीमुळे सुद्धा व्यवसायांना विपरीत परिस्थितीला सामोरे जावे लागलेले आहे. आता कुठे शासनाने सार्वजनिक ठिकाणाच्या प्रवेशावरील निर्बंध उठवल्यानंतर पर्यटन व्यवसायाने चालना घेतलेली आहे व व्यावसायिक पुन्हा उद्योगधंदे सावरण्याच्या कामी लागलेले आहेत. ह्या कठीण समयी सर्व व्यावसायिक शासनाकडून व बँकांकडून सहकार्याची अपेक्षा करीत आहेत. परंतु धक्कादायक बाब म्हणजे गेल्या तिमाहीमध्ये बँकाही वसुलीसाठी आक्रमक झाल्या असून त्यांनी व्यवसायामध्ये जम बसवण्यासाठी धडपडणाऱ्या उद्योगांकडे वसुलीचा तगादा लावलेला आहे. अनेक व्यावसायिकांच्या मालमत्तेचा ताबा बँकांनी घेतला आहे .
सिंधुदुर्ग जिल्ह्याला गेली दोन वर्षे कोरोनाने, तोक्ते चक्रीवादळाने व लहरी निसर्गाने झोडपलेले आहेच. सद्यस्थितीला बँकांची वसुलीसाठीची समन्वयाने मार्ग निघणे गरजेचे आहे. यावेळी उद्योगांना आधाराची खरी गरज आहे. जिल्हाधिकारी व राष्ट्रीयकृत बँकेच्या बँकिंग अध्यक्ष या अधिकारात लीड बँकेच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत बँकेच्या झोनल अधिकारी यांची मिटींग घेऊन थकीत कर्जदार व नवउद्योजक यांना व्यवसायात उभारी घेण्यासाठी पॉलिसी राबवावी अशी मागणी पर्यटन महासंघाच्या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली. त्यावर सदर मागणीचा प्रशासकीय स्तरावर विचार करून व्यावसायिकांसाठी सहकार्य केले जाईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
यावेळी श्री अविनाश सामंत, श्री दादा वेंगुर्लेकर, श्री अविनाश पराडकर, श्री शेखर गाड, ऍडव्होकेट श्री प्रसाद करंदीकर, श्री संदीप बोडये, श्री मिथिलेश मिठबावकर, श्री कमलेश चव्हाण व अन्य पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते अशी माहिती महासंघ अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी दिली .