*”कर्माचं फळ कर्मातच असतं”* हा जीवनविद्येचा फार महत्त्वाचा सिद्धांत आहे. *आपण कर्म करायचं आणि फळ देवाने द्यायचं, असं सर्व ठिकाणी सर्व धर्मामध्ये लिहिलेलं आहे, हे चुकीचं आहे.* कर्माचं फळ देणारा दुसरा कोणीही नाही, कर्माचं फळ कर्मातच असतं. *म्हणून तुम्ही कर्म चांगलं केलंत, फळ चांगलं,* वाईट केलंत, त्याचं फळ वाईट, हे लक्षात घ्यायचं.
तुम्ही म्हणाल काही लोक वाईट कर्म करतात, पण त्यांना फळ चांगलं मिळतं आणि काही लोक चांगलं कर्म करीत जीवन जगतात पण त्यांच्या वाट्याला वाईट परिस्थिती येते, हे कसं?
एखादा मनुष्य सज्जन आहे. तो कोणाच्या अध्यात नाही, मध्यात नाही, तो कोणाला त्रास देत नाही. *पण तो जर अनिष्ट चिंतन करत असेल, अनिष्ट विचार करत असेल, तर ते अनिष्ट चिंतन, अनिष्ट विचार लोकांच्या डोळ्यांना दिसत नाहीत. पुष्कळ वेळा आपण हे अनिष्ट चिंतन करतोय हेही त्या सज्जन माणसाला ठाऊक नसतं.* ह्यामुळे जीवनात वाईट परिस्थिती निर्माण होते.
जगामध्ये अशी माणसं आहेत की त्यांना आपण चिंतन करतो, विचार करतो ही गोष्टच ठाऊक नाही. *आपल्याजवळ मन नांवाचं एक तत्त्व आहे, ते फार सामर्थ्यवान आहे, त्याच्यातून विचार निर्माण होतात.*
*माणसं इतकी अज्ञानी असतात की त्यांना पुष्कळशा गोष्टी ठाऊकच नसतात.* दोन वेळा जेवायचं, निद्रा, आहार, भय आणि मैथुन ह्याच्यापलीकडे माणसं जातच नाहीत. *वाचन करणं, श्रवण करणं, चिंतन करणं, अभ्यास करणं, मार्गदर्शन घेणं ह्या गोष्टी लोकांना माहीत नाहीत.* दोन वेळा जेवायचं, नोकरी करायची, धंदा करायचा, टी. व्ही. बघायचा, झोपायचं. त्यापलीकडे माणूस जात नाही.
“सरड्याची धाव जशी कुंपणापर्यंत” तशी सर्वसाधारण माणसाची धाव ही अशी आहे. *त्याला जीवनात ज्ञान आवश्यक आहे, हेच ठाऊक नाही. त्याला वाटतं, आनंद पैशाने मिळतो.* पैशाने आनंद कधीच मिळत नसतो. आनंद हा नेहमी ज्ञानाने मिळत असतो; आणि म्हणून ज्ञानाला पर्याय नाही.
*जो माणूस ज्ञानी असतो तो सुखी असतो, तो शांत असतो, आनंदी असतो. परिस्थिती बिघडली तरीसुद्धा तो विचलित होत नाही. कारण ही परिस्थिती का बिघडली, त्याचं कारण त्याला ठाऊक असतं.*
*- सद्गुरु श्री. वामनराव पै.*