*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सदस्या लेखिका कवयित्री श्रीम.रेखा कुलकर्णी यांची अप्रतिम अलंकार काव्यमाला* *अष्टाक्षरी रचना
माय सांगते मजला,
कर्णफुले घालावीत.
‘कान हलके’ नसावे,
सुखी होशी संसारात….१
बाळलेणी म्हणूनिया,
लोलकाचे ‘डूल’ कानी.
थोडी मोठी होता होता,
‘बाळी’ मामाने आणली….२
कर्ण फुलाची आवड,
बाई मला लागलेली.
किती आकार प्रकार,
आवडीने जमवली….३
हिरे पाचू नी माणिक,
साखळ्यांचे नि मोत्याचे.
झुबे किती प्रकाराचे,
माझ्या कानी डुलायाचे….४
भेट पहिली म्हणून,
घाली स्वतःच्या हाताने.
कर्णफुले झुलतात,
सखा पाहतो हर्षाने….५
किती जोड कर्णफुले,
माझ्या फनेरपेटीत.
कानी घालता तयांना,
आठवणी दाटतात….६
माझ्या आईने दिलेल्या,
कुड्या टपोर मोत्याच्या.
जीवा परिस जपते,
त्याच लेकीला द्यायाच्या….७.
रेखा कुलकर्णी ©® चिंचवड पुणे
९/९/२०