You are currently viewing फुलांचे मी अंग व्हावे

फुलांचे मी अंग व्हावे

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री श्रीम.सुजाता पुरी यांचा अप्रतिम लेख

*ओठांना जे जमत नाही*
*ते फुलं बोलतात,*
*आपल्यामनातील भावना ते रंगात तोलतात.*

सर्व निसर्गच चमत्काराने
भरलेला आहे हो.बीज मातीत स्वतः ला गाडून घेते आणि सुरू होतो सृजनाचा एक अनोखा प्रवास… त्या बिजातून हळूच एक कोंब डोकावतो आणि मग तो मोठा झाला की फांद्या आणि योग्य वेळ आली कि त्या फांद्यांवर लागतात छानशा कळ्या. त्या कळ्या फुलांची चाहूल देतात.
*कळी लगडते फांदीवरी*
*गर्भार पाऊल भारी*
*कळीत लपते फुल*
*जणू असावी रानभूल*

पानाआडून डोकावणारी कळी मी उद्या फुल होणार आहे हे अबोलपणे सांगत असते.फुल येणं म्हणजे जणू झाडाचे जीवन कृतार्थ झाल्याचे लक्षणच असते.
फुलांची भाषा किती जगा वेगळी.शब्दावाचून सारं काही उलगडणारी.मनाला मनाची ओळख करून देणारी.
आनंदाचे क्षण जसे फुलांविना सुने असतात, तसे दुःखाच्या प्रसंगीही फुलेच धावून येतात.
हजार शब्द जे सांगणार नाही ते फक्त एक फुल सांगते,अशी किमया असते फुलांची.
पहिल्या प्रेमाचा रंग गुलाबी,सांगत असतो गुलाब.अल्लड,अवखळ मैत्री सांगत असतात पिवळ्या रंगाची फुले. तर आदर माया दाखवत असतात शुभ्र फुले.किती विविध रंग आणि किती विविध छटा. त्यांचे वर्णन करायला शब्द ही अपुरे पडतील इतकी सुंदरता त्यात सामावलेली असते.
सभोवतालचे वातावरण बदलून टाकण्याची जादू फक्त फुलांमध्येच असते.आपल्या उदास मनात फुले आनंदाचे रंग भरतात.आपल्या प्रत्येक सुख दुःखात ते सहभागी होतात.आपल्या रंग,रूप,
आकार आणि सुगंधाने. दुसऱ्यांची दुःखे दूर करणाऱ्या या फुलांना ही दुःख असतात बरं.काही फुले दुनियेत येण्या अगोदरच खुडून टाकली जातात.
काहींचे नशीब इतके थोर कि सरळ देवाच्या चरणी अर्पण होतात, आणि काही फुले प्रेताला सजवतात.पण कोणत्याही प्रसंगात आपली भूमिका फुले इमाने इतबारे निभावतात. इतकंच काय पण त्यांना आपण पायाखाली चुरगाळले तरी चुरगाळणाऱ्या पायांनाही ते सुगंधच देतात. देवाच्या चरणी त्यांना आनंद वाटत असेल तर प्रेताचा साज होताना त्यांना ही वेदना होत असतील.देशासाठी प्राण देणाऱ्या वीरांच्या चरणी अर्पण झाल्यावर त्यांचा ही उर अभिमानाने भरून येत असेल आणि ते ही त्या शुर वीरांच्या चरणी अर्पण झाल्यावर म्हणात असतील कि –
*देशासाठी ज्यांचे जीवन*
*देशासाठी झिजतात*
*ज्यांच्या काया लागून त्यांच्या पवित्र पाया*
*हवीत आम्हा असली मरणे*
असं कितीसं आयुष्य येत हो त्यांच्या वाट्याला . पण त्यातही ते आनंद आणि सुगंध यांचीच उधळण करतात. फुलं कधीच कुणाला काट्याप्रमाणे ऋतत नाहीत पण कवी कल्पनेने त्यांच्यावर तो ही आरोप लावला आहे.प्रत्यक्ष मात्र फुलांचे जीवन म्हणजे दुसऱ्यांसाठी कसे जगावे याचेच आदर्श उदाहरण आहे.
साध्या प्रसंगाला ही उत्सव करण्याचे सामर्थ्य फुलांच्या अंगी असते.आपल्या जवळचा सुगंध ते कधीच जवळ ठेवत नाहीत. कोमेजली तरी समोरच्याला टवटवीत करून जाण्याची भावना त्यांच्यात असते.
प्रत्येक फुलांचे रंग,आकार, सुंगंध सगळे किती निरनिराळे पण सगळ्या पासून मिळणारा आनंद मात्र सारखाच अपरिमित.नेहमी दुसऱ्यांसाठी जगणाऱ्या या फुलांबद्दल कवयित्री शांता शेळके म्हणतात कि –
*सहज फुलू द्यावे फुल,*
*सहज दरवळावा वास*
**अधिक काही मिळवण्याचा,*
*करू नये कधीच अट्टाहास*
माणसांनी जीवनही असेच फुलांप्रमाणे जगावे.ओढून ताणून काही मिळवण्यापेक्षा सहजगत्या देणे नेहमी सोपे असते हेच जणू फुले आपल्याला सांगत असतात.
रस्त्याच्या कडेला उभी असलेली गगनचुंबी जाई सुद्धा कोणता ही वाटसरू ओळखीचा नसतानाही सर्वांना सारखीच सुगंधाची मुक्त पखरण करत असते.फुल होण्यासाठी कळ्या रात्र भर जागत असतात. जणू काही सकाळी आपले स्वागत करण्याचीच त्या तयारी करत असतात.

*देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्या ने घेत जावे*
*घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात ही घ्यावे*
आपले सगळे जीवन एक प्रकारे बलिदान देणारी ही फुले जणू काही जगण्याची रीतच आपल्याला सांगत असतात.
फुलांकडून एकच गोष्ट शिकावी ती म्हणजे – जीवन प्रत्येकजण जगत असतो परंतु जीवनाचा महोत्सव साजरा करावा तर फुलांसारखा…..
जीवन रसाचा प्याला जरी कडू वाटला तरी तो प्राशन करावा लागतो.फुलांना ज्याप्रमाणे पतझड असते त्याच प्रमाणे जीवनात सुखदुःख असतेच असते . दोन्हीना सारख्याच सामर्थ्याने तोंड देतो तोच खरा मानव .
————————
*✒️ सुजाता नवनाथ पुरी*
*अहमदनगर*
*8421426337*

प्रतिक्रिया व्यक्त करा