सागरी साहसी स्पोर्ट्सना सरकारने प्राधान्य द्यावे
संपादकीय….
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शेजारील राज्य गोवा हे केवळ पर्यटनाच्या आधारावर देशात नाव कमावून आहे. गोव्याची आर्थिक उन्नत्ती ही पर्यटन उद्योगातूनच झाली असून गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांपेक्षा सुंदर आणि स्वच्छ सागर किनारे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभले आहेत, परंतु महाराष्ट्र सरकार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी, नेते, मंत्री यांच्या अनास्थेमुळे जिल्ह्याच्या पर्यटनाचा विकास होऊ शकला नाही. सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेला असतानाही जिल्ह्याच्या नेत्यांच्या अनास्थेमुळे जिल्ह्यातील पर्यटन उद्योगाला चालना मिळाली नाही.
जिल्ह्यातील सागरकिनारे हे इतर कोणत्याही सागरी किनाऱ्यांपेक्षा सुंदर आणि स्वच्छ आहेत. परंतु अनेक सागरी किनाऱ्यांपर्यंत जाण्यासाठी चांगले रस्ते, माहिती फलक आणि प्रसिद्धी मिळालेली नाही. भोगवे सारखा समुद्रकिनारा सर्वात सुंदर म्हणून देशात नावाजला जातो, परंतु म्हणावे तसे पर्यटक जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यांवर येताना दिसत नाहीत.
मालवण तालुक्यातील तारकर्ली, देवबाग, वेंगुर्ला तालुक्यातील वेळाघर येथे साहसी समुद्री क्रीडा प्रकार खेळावयास मिळतात. मालवण येथे स्कुबा डायव्हिंग, स्नोर्कलिंग, जेट स्कायटिंग, असे एक ना अनेक सागरी साहसी पर्यटनाचे प्रकार अगदी माफक दरात उपलब्ध आहेत. गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर तीन ते चार हजार रुपये मोजून पर्यटक तिथे जातात आणि तेच गोव्यातील पर्यटन एजंट आपल्याकडील पर्यटकांना स्वतःच्या खाजगी गाडीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणून दोन चारशे रुपयांत समुद्री स्पोर्ट्स उपलब्ध करून देत वरची अडीज ते तिन हजारांची मलई आपण खातात. आपल्याकडे समुद्री स्पोर्ट्स क्लब ला चालविण्यासाठी रीतसर परवाने नसल्याने विनापरवाना साहसी स्पोर्ट्स चालविले जातात, त्यातून मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांचे फावते, ते वसुली करून गप्पगार होतात. परंतु आपल्याकडील समुद्री स्पोर्ट्स क्लब ना रीतसर परवाने उपलब्ध करून दिल्यास जिल्ह्यातील पर्यटनाला एक वेगळी दिशा प्राप्त होईल, बेरोजगारांना काम मिळेल आणि जिल्ह्याला पर्यायाने महाराष्ट्र शासनाला महसूल मिळेल. जिल्ह्यातील आमदार, खासदार, मंत्री यांनी या बाबीकडे गंभीरपणे पाहून जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले पाहिजे तरच जिल्ह्यातील गोरगरीब जनतेने दिलेल्या मतांचा आदर राखला जाईल आणि मतदान केल्याचं सार्थक होईल…
जिल्ह्यात असलेली नैसर्गिक साधनसामग्री ही इतरत्र कुठेही नाही, जिल्ह्यासारखे निसर्गसौंदर्य अगदी गोव्यात सुद्धा पहायला मिळत नाही. विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, देवगड, सारखे किल्ले, डोंगरदऱ्या, नद्या, माड-फोफळींच्या, आंबा काजूच्या बागा हे निसर्गाने जिल्ह्याला दिलेले वरदान आहे. जिल्ह्यातील या निसर्गसौंदर्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विचार व्हावा जेणेकरून जिल्ह्यातील तरुण वर्ग बेरोजगारी म्हणून जिल्ह्याबाहेर न जाता आपल्याच गावात राहून पर्यटनावर आधारित उद्योगधंदे उभारील आणि आपल्या बरोबर इतर चार हातांना काम देईल…तरच जिल्ह्याची प्रगती होईल. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी अनास्था झटकून गंभीरपणे यावर विचार करून पर्यटनाला चालना द्यावी अशी मागणी सागरी किनारपट्टीवरील व्यावसायिकांकडून आणि राज्याच्या सत्तेतीलच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून होऊ लागली आहे.