You are currently viewing नरंदे गावासाठी चौगुले कुटूंबियातर्फे मोफत रुग्णवाहिका प्रदान

नरंदे गावासाठी चौगुले कुटूंबियातर्फे मोफत रुग्णवाहिका प्रदान

 

इचलकरंजी / प्रतिनिधी :

नरंदे येथे दानशूर व्यक्तीमत्व अण्णासाहेब चौगुले कुटूंबियातर्फे कै.सुनंदा चौगुले यांच्या स्मरणार्थ आज रविवारी आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रामस्थांच्या आरोग्य सेवेसाठी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पार पडला.

नरंदे गावातील प्रतिष्ठित नागरिक अण्णासाहेब व त्यांच्या धर्मपत्नी सुनंदा या चौगुले दाम्पत्याने आपल्या मुलांबरोबरच सुना, नातवंडांवर शैक्षणिक, धार्मिक व सामाजिक संस्कार केले आहेत. त्यामुळेच चौगुले कुटूंब हे सुसंस्कारित व दानशूर कुटूंब म्हणून ओळखले जाते. मागील नोव्हेंबर महिन्यात सौ.सुनंदा यांना देवाज्ञा झाली आहे.

त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ नरंदे गावातील नागरिकांवर वेळेत वैद्यकीय उपचार व्हावेत व त्यांची चांगली आरोग्य सेवा घडावी ,याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गावासाठी मोफत रुग्णवाहिका प्रदान करण्याचा संकल्प केला होता. त्या संकल्पाची पूर्तता आज रविवारी सायंकाळी नरंदे ग्रामपंचायतीच्या पटांगणात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याने करण्यात आली.

यावेळी मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील – यड्रावकर यांच्या हस्ते तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, आमदार राजूबाबा आवळे ,शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगांवकर, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, माजी सहाय्यक शिक्षण संचालक संपत गायकवाड, दानशूर व्यक्तीमत्व अण्णासाहेब चौगुले, दादासाहेब चौगुले, उद्योजक संजय चौगुले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह मान्यवरांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अण्णासाहेब चौगुले व त्यांच्या कुटूंबियाने आपल्या कुटूंबातील व्यक्तीच्या स्मरणार्थ गावाच्या आरोग्य सेवेसाठी मोफत रुग्णवाहिका प्रदान करुन आदर्श सामाजिक कार्याचा वस्तुपाठ समाजासमोर घालून दिला असल्याचे गौरवोद्गार काढले. तसेच याच भावनेतून सर्वांनी सामाजिक कार्याचा अंगीकार केल्यास निश्चित समाज परिवर्तन होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी अनेक मान्यवरांसह ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी आदर्श सामाजिक कार्याबद्दल दानशूर व्यक्तीमत्व अण्णासाहेब चौगुले, दादासाहेब चौगुले, उद्योजक संजय चौगुले यांच्यासह संपूर्ण चौगुले कुटूंबियाचे कौतुक केले.

या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, सदस्य यांच्यासह नरंदे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा