You are currently viewing व्हॅलेन्टाईन डे….(प्रेमाचा दिवस)

व्हॅलेन्टाईन डे….(प्रेमाचा दिवस)

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांचा लेख*

 

*व्हॅलेन्टाईन डे* ……

………*(प्रेमाचा दिवस)*

 

पाश्चात्य संस्कृतीचाच एक भाग असलेला “व्हॅलेन्टाईन डे” म्हणजेच प्रेम दिवस किंवा प्रेमाचा दिवस…एक दिवस का होईना प्रेमासाठी राखीव ठेवायचा आणि साजरा करायचा अशी ती संकल्पना… तसं पहायला गेलो तर दैनंदिन जीवनात येणारे दिवस हे प्रेमाचेच असतात, द्वेषासाठी म्हणून कोणीही कुठल्या दिवसाची निवड करत नाही, परंतु आपल्या संस्कृतीत बसत नसला तरी एखादा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करण्यास काय हरकत आहे?

प्रत्येक हिंदूंच्या घरात देवघर असतंच आणि देवघरात श्री गणेशाची प्रतिमा, मूर्ती पूजन केलेली असते. (इतर धर्मांमध्येही त्यांचे देव असतील) नित्यनेमाने त्याची पूजा, दिवाबत्ती देखील करत असतात, परंतु गणेश चतुर्थीला त्यापैकी कितीतरी घरांमध्ये श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते, दीड दिवस ते अगदी अकरा, एकवीस दिवस मनोभावे त्याची आराधना केली जाते. आरती, भजन इत्यादी कार्यक्रम अगदी भक्तिभावाने केले जातात. गोड जेवण आणि येणाऱ्या प्रत्येकाला नैवेद्य, महाप्रसाद दिला जातो. परंतु प्रत्येकाच्या घरात श्रीगणेश असूनही गणेश चतुर्थी एका वेगळ्या भावनेने उत्साहात साजरी केली जाते….वर्षभर गोडधोड, चकली, शंकरपाळी आणि पोहे घरात करून खाल्ले जातात, परंतु दीपोत्सव म्हणजेच दिवाळीत त्याच वस्तू, खाद्य पदार्थ प्रत्येक घरात करून फरळासाठी सगे सोयरे बोलवून दिवाळी साजरी केलीच जाते, मग व्हॅलेंटाईन डे म्हणून एखादा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करण्यास हरकत नसावी असं माझं वैयक्तिक मत.

पाश्चात्य संस्कृतीचा बाऊ करताना आपल्या मुलांनी इंग्रजी कॉन्व्हेंट शाळेतच शिकावे, चीन, रशिया, इंग्लंड, अमेरिकेत जाऊन डॉक्टरी शिकावी अशी अपेक्षा व्यक्त करणारे, घरातील भिंतीवरील इंग्रजी कॅलेंडर मधील तारखानुसार आयुष्य जगणारे, ब्रॅण्डेड वस्तूच, बाहेर पडले की बिस्लरीच पाणी अशी पाश्चात्य संस्कृती प्रत्येक क्षणी जपणारेच व्हॅलेन्टाईन डे ला विरोध करताना दिसतात. पाश्चात्य संस्कृती नको म्हणणाऱ्यांनी कधीतरी स्वतः पाश्चात्य गोष्टींचा त्याग करून स्वदेशीचा संपूर्ण स्वीकार करावा तरच आपल्याला पाश्चात्य संस्कृतीला विरोध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. अन्यथा बेगडी प्रेमासारखे दिखाऊ विरोध करून काहीही उपयोग नाही.

रोम मधील संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. रोम मधील संतांनी घरातून विरोध असणाऱ्या प्रेमी युगुलांची गुपचूप लग्न लावून दिली होती. त्यावेळेस संत व्हॅलेन्टाईन यांना अटक होऊन फाशीची शिक्षा दिली. प्रेमासाठी संतांनी आपला जीव त्यागला म्हणून तो दिवस व्हॅलेन्टाईन डे या नावाने साजरा केला जाऊ लागला अशी आख्यायिका सांगितली आहे. परंतु खरं पाहिलं तर प्रेम ही विलक्षण आनंद देणारी संकल्पना आहे. म्हणून तर म्हटलं आहे….*प्रेमाला उपमा नाही ते देवघराचे देणे…..* प्रत्येकाला जीवनात कोणी ना कोणी प्रेम करणारं हवंच असतं. मग त्यासाठी तो प्रियकर-प्रेयसीच हवी असंही काही नाही. आई, बहीण, मित्र-मैत्रीण अशी अनेक नाती आहेत जी प्रेम देऊ शकतात, प्रेम करू शकतात, प्रेमाचे गोडवे गाऊ शकतात. प्रत्येकाला आपल्या जीवनात निर्णय घेण्याचा अधिकार असतो, काहींना व्हॅलेंटाईन दिनाची आतुरता असते, काहींना हा दिवस आला काय आणि गेला काय काही फरक पडत नाही, तर काही लोक असेही असतात जे इंग्रजीचं अनुकरण क्षणोक्षणी करतात परंतु व्हॅलेन्टाईन डे चा मात्र तिरस्कार, राग राग करतात. पण तरीही काहीजण या खास दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात, कारण एका खास दिवसाचे औचित्य साधून जवळच्या व्यक्तीला त्यांना काहीतरी भेट द्यायचं असतं आणि प्रेमाची भेट देण्यासाठी यापेक्षा दुसरा चांगला दिवस, क्षण कोणताही नसतोच. परंतु त्याचवेळी आणखी एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येते ती म्हणजे व्हॅलेंटाईन डे या दिवसाच्या निमित्ताने गल्लीबोळात, बागेत, समुद्रकिनारे आदी सार्वजनिक ठिकाणी प्रेमाचे थिल्लर चाळे करणारी युवाई…जोडपी… या बेगडी प्रेमाच्या थिल्लरतेमुळे व्हॅलेंटाईन डे सारखे दिवस पावित्र्य न जपता बदनामीच्या खाईत लोटले जात आहेत. *(त्या थिल्लर चाळे करणार्यांना दोष देण्यात अर्थ नसतोच, कारण ते वयच तसं असतं…*)

आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण रोज प्रेम दिवस साजरा करू शकतो. परंतु त्यातून आनंद, समाधान भेटत नाही….मज्जा येत नाही. बायकोने रोज घरी चिकन खाऊ घातलं तरी बायकोसोबत एखादा दिवस हॉटेलमध्ये जाऊन चिकन खाण्यात काहीतरी वेगळी मजा असते… अगदी तसंच…. मला सुद्धा व्हॅलेन्टाईन डे म्हणजे खूपच बोअरिंग वाटायचं…कंटाळवाणा दिवस…लोक काय म्हणून हा दिवस साजरा करतात? असा प्रश्न पडायचा…जिथे आपल्या प्रियकर, प्रेयसी कडून काहीतरी भेट मिळण्यासाठी केलेला केवळ अट्टाहास…

पण एक सांगा….. आपल्या पत्नीलाही वाटत नसेल का? आपल्या नवऱ्याने एक दिवस तरी आपले हट्ट पुरवावेत, कुठेतरी बाहेर फिरायला न्यावं…काही दिलं घेतलं नाही तरी एखाद्या दिवसाचे काही तास सोबत घालवावेत….?

आपण सिनेमामध्ये पाहतो व्हॅलेन्टाईन डे वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो अगदी तसंच वाटत असते ना प्रत्येकाला…. आपलीही/आपलाही कोणीतरी व्हॅलेन्टाईन असावा…

लग्नाच्या आधी आयुष्यात कोणीच प्रियकर, प्रेयसी नसणाऱ्या मुलाला/मुलीला देखील वाटत असणारच ना की, लग्नानंतर तरी आयुष्यातील जोडीदाराने आपल्याला व्हॅलेन्टाईन डे दिवशी तो सर्व आनंद द्यावा जो पूर्वी कधीच मिळाला नव्हता…. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असणाऱ्या आजी-आजोबांनाही वाटतंच असेल ना?……आपल्याही आयुष्यात कुणीतरी आपली काळजी घेणारं आपल्या सोबत असावं….आपल्यालाही म्हातारपणी कुणीतरी प्रेम करावं…

आयुष्यात कुणालाही आपण एकटं रहावं, एकटंच जगावं असं वाटत नसतं. प्रत्येकाला जगण्यासाठी जोडीदार हा हवाच असतो…..मग तो मित्र, मैत्रीण असो वा पत्नी अथवा इतर कोणीही. अशावेळी आपण ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतो…जीव ओवाळून टाकतो ती व्यक्ती सोबत असेल तर…*”क्या कहने”. सोन्याहूनही पिवळे…* अशावेळी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची मजा ही काही औरच असते….

कारण,,,

आपल्या आयुष्यातील महत्त्वाची असणारी ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीवर आपण किती प्रेम करतो हे दाखविण्यासाठी यापेक्षा दुसरा उत्तम दिवस आणखी कोणताही नाही…

“दिल तो पागल हैं” दिल दिवाना बिन सजना के माने ना” “कुछ कुछ होता हैं” …”मेरा दिल भी कितना पागल हैं” अशा गाण्यांनी सजलेले प्रेमावरचे सिनेमे पाहून आयुष्य प्रेममय केलेल्या पिढीला व्हॅलेंटाईन डे हा नेहमीच खास वाटत आला आहे. त्यावेळी भेट वगैरे देणं हे प्रकार नव्हतेच कारण खिशात पैसे नसायचे…आणि घेणाऱ्याला भीती…”कोणी दिली म्हणून सांगायचं?”….पण दिवसभर मित्र-मैत्रिणींसोबत वेळ मजेत जायचा….

परंतु…आता व्हॅलेंटाईन डे खूपच खर्चिक आणि व्यावहारीक झाला आहे. तरीही व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेम दिवसाचा गाभा मात्र अजूनही तसाच आहे…”प्रेम देणे”…

तुम्ही आज कोणाच्या प्रेमात असाल…नसालही…किंवा तुमच्या प्रेमाचा “दर्दभरा” अंत झालेला असेलही….पण आयुष्यात जगण्यासाठी प्रेम हे महत्त्वाचे असतेच…कारण

प्रेमामुळेच अनेकांना जगण्याची प्रेरणा मिळाली…प्रेमामुळेच नाती टिकली…कुटुंब बहरली…वाढली…आणि जीवनाला नवा अर्थ मिळाला…

….म्हणून तर

 

*प्रेम पैशाने विकत मिळत नाही*

*प्रेम विकत देताही येत नाही….*

 

प्रेम आपल्या जवळच्या माणसांवर, आई, वडील, भाऊ, बहीण, मित्र-मैत्रिणी, बायको, सगे-सोयरे यांवर करा……अगदी प्रियकर… प्रेयसीवरही करा…..आणि प्रेमाचा दिवस प्रेमाला प्रेम देऊनच साजरा करा…!!

 

©[दिपी]🖊️

दीपक पटेकर, सावंतवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 10 =