कोमसाप, सह्याद्री फौंडेशन, केशवसुत कट्टा मित्रमंडळ, मराठा समाज आदींकडून आयोजन
भारतरत्न गानकोकीळा लता मंगेशकर यांचे रविवारी ६फेब्रुवारी रोजी निधन झाले. संगीताच्या क्षेत्रात आणि स्वरांच्या दुनियेवर ज्यांनी गेली अनेक दशके राज्य केले आणि हजारो गाण्यांना आपल्या आवाजाने मधुर केलं त्या संगीताच्या उपासक गानकोकिळा लतादीदींनी तसेच कोकणचे सुपुत्र दशवताराचे लोकराजा सुधीर कलिंगण, चित्रपट सृष्टीतील राजबिंडे व्यक्तिमत्त्व रमेश देव, समाजाला दिशा देणारे थोर साहित्यिक अनिल अवचट तसेच सावंतवाडीतील ऍड राया पै या महनीय व्यक्तिमत्वांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सावंतवाडीच्या केशवसुत कट्ट्यावर कोमसाप, सह्याद्री फौंडेशन, मराठा समाज बांधव व केशवसुत कट्टा मित्रमंडळाने आज संध्याकाळी श्रद्धांजली सभा आयोजित केली होती.
केशवसुत कट्ट्यावर श्रद्धांजली सभेत प्रथम भारतरत्न लता मंगेशकर आणि लोकराजा सुधीर कलिंगण यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून वंदन करण्यात आले. सावंतवाडीचे आमदार दिपकभाई केसरकर हे देखील आवर्जून या श्रद्धांजली सभेला उपस्थित होते. सर्वप्रथम कोमसाप चे अध्यक्ष प्रा.सुभाष गोवेकर यांनी श्रद्धांजली वाहिली त्यानंतर सह्याद्री फौंडेशन चे सुनील राऊळ, दत्ताराम सडेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मराठा समाजाचे प्रताप परब यांनी देखील लतादीदी तसेच सुधीर कलिंगण यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. कोमसाप च्या मेघना राऊळ, नकुल पार्सेकर, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, आमदार दीपक भाई केसरकर आदींनी सर्व महनीय व्यक्तींबद्दलच्या स्मृती जागवित मनातील भाव व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. श्री प्रभू यांनी लता मंगेशकर यांनी गायिलेले गीत सादर करून कार्यक्रमाची सांगता केली. सूत्रसंचालन कोमसाप चे तालुका उपाध्यक्ष ऍड संतोष सावंत यांनी केलं.
केशवसुत कट्ट्यावर भरलेल्या श्रद्धांजली सभेसाठी आम.दीपक केसरकर, सह्याद्री फाऊंडेशन चे सुनील राऊळ, मराठा समाज बांधव प्रताप परब, महादेव माळकर, प्रल्हाद तावडे, विभावरी सुकी, दत्ताराम सडेकर मा.नगराध्यक्ष संजू परब, कोमसापचे अध्यक्ष प्रा.सुभाष गोवेकर, उपाध्यक्ष ऍड संतोष सावंत, सचिव प्रतिभा चव्हाण, जिल्हा सचिव भरत गावडे, नकुल पार्सेकर, कवी दीपक पटेकर, मेघना राऊळ, दिलीप भालेकर,मा.नगरसेविका दीपाली भालेकर, प्रदीप ढोरे, श्री.प्रभू, गोठोस्कर, सौ.संजना परब, प्रमोद सावंत, भूषण सावंत, विनायक गावस, आदी पत्रकार तसेच विविध स्तरातील मान्यवर व शहरवासीय उपस्थित होते.