जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या राष्ट्रीय पुरस्कारित ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांचा स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा अप्रतिम लेख
खरंतर ह्या विषयावरून गेली सहा दशके मी अस्वस्थ आहे.
मनात अनेक प्रश्नांचा गुंता आहे पण …
आताचे माझे वय नि सहा दशका पुर्वीचा काळ यात खूप
अंतर आहे.. सर्वार्थानेच …
आता मी धाडसी पणे बोलू शकते , तेवढी हिंमत माझ्यात
आली आहे. प्रसंगी शब्दांचे चाबुक मारायलाही मी घाबरत
नाही कारण तेवढा आत्मविश्वास माझ्यात आला आहे . आपले चारित्र्य शुद्ध असेल तर कोणी वाकडा डोळा करून
आपल्याकडे पाहू शकत नाही व प्रसंगी त्यांना फटकारायची
वेळ आली तर आपले ही अवसान गळू नये एवढी हिंमत
आपल्यात असावीच …
असो …
खरे आहे की कवी कल्पना आहे माहित नाही पण …
“अशीच आमुची आई असती(शिवाजी महाराज असे म्हणतील
.. ते ही जिजाऊं विषयी ? असे मला नाही वाटत)
असो.. ओळी छानच आहेत .. स्रियांप्रती पुरेपूर आदर व्यक्त
करणाऱ्या आहेत .. जाती धर्मा पलीकडे आहेत हा भावार्थ
महत्वाचा आहे .
आणि असे उद्गार आया बहिणींविषयी काढणाऱ्या छत्रपतींच्या
साम्राज्यात त्यांचे वारस म्हणून आम्ही वावरतो. त्यांचे म्हणवण्यात आम्हाला धन्यता वाटते मग.. त्यांचा एक ही
चांगला गुण न घेणारे आम्ही इतके कपाळ करंटे का निपजलो
कि आमच्या वर्तनाची आमच्या आया बहीणींना लाज वाटावी…? आम्ही त्यांना संरक्षण देणे तर दूरच पण त्यांचा
मानभंग करतो याची आम्हाला जरा ही शरम वाटत नाही काय ?
आपल्या लेकीबाळी ही परघरी नांदतात .. त्यांच्याशी
असे निंदनिय वर्तन आपण खपवून घेऊ काय ? याचे उत्तर
जर नकारार्थी असेल तर घरोघरीच्या गृहिणींचा त्यांच्या
वयाचा पदाचा परिस्थितीचा विचार न करता त्यांना असे वेठीस
धरणे कितपत शोभनिय आहे? काही काही माणसांची बुद्धीच
काम करत नाही अशा वेळी .. असे मला वाटते .
आपल्या भावनेच्या पुरात ते इतके वाहून जातात की, त्यांना
चांगले वाईटातला फरक ही कळेनासा होतो इतके ते विकाराच्या आहारी जातात … चुक सुधारण्या ऐवजी उत्तरोत्तर
घसरत जातात .. व आपणच केलेल्या पापाच्या पश्चातापाच्या खाईत झुरत बसतात .. अर्थात .. तेवढी
सद् सद् विवेकबुद्धी असेल तर ….
अन्यथा त्यांचे पतन ठरलेलेच असते ….असो …सख्यांनो…
एवढ्या सक्षम व्हा की .. आपल्याला वेठीस धरण्याची
हिंमत कोणी करू नये .. वेळीच शब्दांचे चाबुक उगारा ..
आसूड ओढा की पुन्हा कुणी हिंमत करू नये , कुणी खौट
म्हटले तरी चालेल पण … अपशब्द वापरण्याची हिंमत
करू नये …आपणच आपल्या बॅाडीगार्ड व्हा .. मदतीवर
विसंबून राहू नका …कोणताही फणा वेळीच ठेचला पाहिजे
अन्यथा … तो जखमी करतोच …
सगळेच पुरूष वाईट नाहीत पण वाईट पुरूष नाहीत
असे ही नाही ना …? ही पुरूषी , वर्चस्व गाजवणारी
स्री कडे मादी म्हणून बघणारी प्रवृत्ती मोडून काढा .
अहो, ह्यांच्या कोत्या प्रवृत्तीची एवढी मजाल की , कोणी
महिला मंगळसूत्र घालत नसेल तर .. तिच्या नवऱ्याला
चालते पण .. ह्यांना चालत नाही , त्या परस्री शी यांचा
काही संबंध नसतांना यांच्या पोटात दुखते जणू ती त्यांची
बायकोच आहे …
बोलण्या सारखे खूप आहे .. संतापाचा कडेलोट होऊन डोक्याचा भुगा होतो की काय असे वाटते ..
लिहावे तेवढे थोडेच आहे .. आता थांबते ..
आणि हो ..
ही फक्त माझी मते आहेत …( काही अपवाद
सोडल्यास आपण नक्की सहमत होणार याची मला खात्री आहे)…..
धन्यवाद ..
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि .८ फेब्रुवारी २०२२
वेळ : दुपारी ३ : ०४