जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ.सुमती पवार यांचा अप्रतिम लेख
विषय छान आहे … पण खरं सांगू का हा शब्द आमच्या
कोषातच नव्हता हो … ? आता म्हातारपणी आताशा कुठे
त्याचा अर्थ कळायला लागला आहे ….
म्हणजे तुमच्या जडण घडणीत कुणी तरी तुमचे प्रेरणा स्थान
किंवा आधारस्तंभ किंवा पाठबळ देणारे कुणी तरी असते मग
लोक म्हणतात … अमुक अमुक माझे प्रेरणा स्थान आहे वगैरे
वगैरे …
पण बुवा आमचे म्हणाल तर … आमचे असे काही नाही ..
अहो, खेड्यात गेलेले आमचे बालपण ! ते ही पन्नास साठ
वर्षांपूर्वी… जिथे शिकायला .. शाळेत जायलाच , माझे
वडिल गावाचे जिल्ह्याचे पुढारी असल्यामुळे मुलांना शाळेत
पाठवावे म्हणून शिपाई बरोबर घेऊन त्यांना जबरदस्तीने मुलांना
शाळेत काढावे लागायचे.. शिकून करायचे काय ? “बालिस्टर
थोडाच होणार आहे ? “कशाला शाळेत जायचे अशी समाजाचीच मानसिकता होती तिथे मुले कशाला शाळेत
जातील ? मग रडत भेकत थयथयाट करत मुलांची शाळेत
वरात निघे व बाकीची मंडळी बघे बनून त्याचा आनंद लुटत
असत .. सकाळी सकाळी फुकटचा सिनेमा …
मग तुम्हीच सांगा … प्रेरणा या शब्दाशी आमची ओळख तरी
होती का .. मुळीच नव्हती ….
मग आता प्रश्न आला,तरी आम्ही इतके कसे शिकलो ..?
हो, १९५५-६० च्या काळात माझे भाऊ व बहिण सुद्धा धुळ्याला हायस्कूल मध्ये शिकत होते व मी सर्वात लहान
असल्यामुळे कापडण्याच्या शाळेत जात होते. आम्ही शिकत
होतो याला कारण आमचे क्रांतिकारक थोर स्वातंत्र्यसैनिक
असलेले धुळे जिल्ह्याचे थोर नेते मा. विष्णुभाऊ पाटील हे होत.
नुकतेच स्वातंत्र्य मिळालेले होते व देशप्रेमाने भारीत अशी ही
पिढी होती नि त्यांना वाटत होते भारताच्या प्रत्येक मुलाने शिकले पाहिजे त्या शिवाय तरणोपाय नाही म्हणजे देशावरील
निस्सिम प्रेम व भक्ती ही “त्यांची” प्रेरणा होती , जेव्हा आम्हाला काही ही कळत नव्हते ….
माझ्या बाबतीत प्रेरणा वगैरे नाही पण … माझे वडिल खूप
काही तरी मोठे आहेत , नक्की काय ते कळत नव्हते पण
कळत नकळत ते माझे आदर्श होते . म्हणजे आजच्या भाषेत
प्रेरणा म्हणू या …वडिल मला खूप आवडायचे, त्यांची मी ही
खूप लाडकी होते .. ते मला एखाद्या महान नेत्यासमान वाटायचे व ते तसे होते . जिल्ह्याचे व गावाचे सर्वस्व …व
आदर्श सुद्धा …!
रिवाजा नुसार .. त्या वेळच्या .. १८-१९ ची असतांना लग्न
झाले व संसाराला लागले .शिक्षण एफ् वाय बी ए.
एक मात्र मनात ध्यास होता …” मी एम.ए होणार “
अहो , त्या वेळी बी ए लोकांची सुद्धा खूप “वट” होती.
त्यांना त्या काळी पाचहजार हुंडा मिळत असे एवढा”भाव”
होता. आणि मग माझा दोन्ही आघाड्यांवर झगडा सुरू झाला.
संसार ,मुले,जबाबदाऱ्या (“वय अवघे वीस वर्ष “ ),असंख्य
अडचणींना तोंड देत, पायपीट करत , रोज १०-१५ किलोमिटर
चालत,मी वयाच्या पंचविसाव्या वर्षी एम ए . बी एड् झाले..
बाहेरून शिकत,प्रसंगी पार्ट टाईम नोकरी करत, मुलांना सांभाळत घरी अभ्यास करत मी क्लास मिळवत पास झाले.
मग सांगा …. माझी प्रेरणा कोण ..? तर मंडळी माझी प्रेरणा
मीच आहे …! असंख्य अडचणी होत्या, पती प्रोफेसर होते,
त्या वेळच्या रिवाजा नुसार मी शिकले नसते तरी चालले
असते.पण माहित नाही, कुठली अशी प्रेरणा होती की मी
असंख्य अडचणींना तोंड देत शिकत होते. म्हणून म्हटले की
ध्यास होता.. मी एम.ए होणार नि मी झाले .अहो, बी एड् ला
ॲडमिशन घ्यायला पैसे नव्हते.मी माझ्या वडिलांनी जावयाला
केलेली अंगठी सराफ बाजारात ११४ रूपयाला, (१९७३) मोडून १०० रूपयांत ॲडमिशन घेतली नि मला बी. ए ला चांगले गुण असल्यामुळे बी.एड् करत असतांना दरमहा
रूपये -४५ इतके स्टायपेंड मिळाले व माझ्या अडचणी कमी
झाल्या.
एक मात्र खरे की … लहानपणापासून वाचनाचे जबरदस्त
वेड होते. कापडण्यालाही सरोजीनी बाबरांची पुस्तके वाचलेली व वर्तमानपत्रे वाचलेली
आठवतात व पुढे धुळ्याच्या एस.एस. व्ही.पी.एस् कॅालेज मध्ये
असतांना त्या वेळच्या फडके खांडेकर अत्रे माडखोलकर
हरिभाऊ ,पु ल , जयवंत दळवी अशा समस्त लेखकांच्या
पुस्तकांचा मी फडशा पाडला म्हटले तरी चालेल . झपाटलेली
वाचनवेडी अशी ती आमची पिढी होती . मला वाटते ….
माझ्यावर कळत नकळत वाचनाचा व ह्या लेखकांचा संस्कार
झाला .. कदाचित तो ही माझा प्रेरणास्रोत असावा असे वाटते.
काही असो , कुठली ही प्रेरणा असो मी शिकले हे किती बरे
झाले ..नाही हो .. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.. तेव्हा ही
आणि आता ही ..आपल्या मनात निश्चित असे एक ध्येय
हवेच..म्हणजे माणूस अडचणींवर मात करत ध्येयाच्या दिशेने
वाटचाल करत राहतो हे खरे आहे.नाही तर ..
आज तरी ह्या विषयावर मी तुमच्यासमोर माझी मते मांडू
शकले असते का ….?
आणि हो… ही फक्त माझीच मते आहेत बरं का …
धन्यवाद ….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : ५ फेब्रुवारी २०२२
वेळ : दुपारी १:४३