गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड
मुंबई
गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या २८ दिवसांपासून त्यांची प्रकृतीशी झुंज सुरु होती. त्यांची कालपासून (ता.०६) प्रकृती पुन्हा बिघडल्याने चिंताजनक झाली.
कोविड न्यूमोनिया झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करुन उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर उपचारांना त्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
परिणामी, त्यांनी कोरोनावर मात केली. त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. गेल्या ३० दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पुन्हा त्यांची प्रकृती खालावल्याचे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.
त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी देशभरात प्रार्थना केल्या जात होत्या. अखेर आज सकाळी ९.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे देशभरातून शोक प्रकट होत आहे. तसेच, विविध मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली व्यक्त केली आहे.