जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांचा ललित लेख
उजाडणारा प्रत्येक दिवस एक नवी आशा, अपेक्षा घेऊन जन्मास येतो…रात्रीचा काळोख हळूहळू कमी होतो….अस्पष्ट धूसर….धुक्याने झोकाळलेली पहाट पुन्हा एकदा नव्याने जन्म घेते….डोंगराच्या आडोशाने..झाडांच्या, पानांच्या झरोक्यातून सकाळची तेजस्वी सोनेरी किरणे वायूच्या वेगापेक्षाही तेज धरतीवर प्रकट होतात….आणि झाडे वेली पाने फुले…..सारी सृष्टी आनंदून जाते…नव्या दिवसाची सुरुवात आनंदाने, हर्ष, उल्हासाने होते. सकाळच्या प्रहरी कोकिळेचा मधून सुरही मनाला प्रसन्न करतो…आयुष्यात काहीतरी चांगलं घडेल अशी आशा दाखवतो…..शुभ फळांचा जणू संकेतच तो…
कोवळ्या किरणांनी आपली सोनेरी नाजूक किरणे धरेवर सांडताच….गुलाबाची कळी देखील हळूच फुलून आली…पवनाच्या नाजूक हळुवार स्पर्शाने खुलली….हसली…मोहरली…बहरली…अगदी तुझ्यासारखीच…
पहाटेच्या गोड स्वप्नातून जाग यावी अन डोळ्यांसमोर रूप सुंदरी असावी….गालावर मोहक हास्य, चेहऱ्यावर प्रसन्न भाव, डाळिंबाच्या दाण्यासारखे गडद लाल खुललेले ओठ अन नशील्या…घायाळ करून टाकणाऱ्या नजरेने माझं हृदय चोरावं… तशी तू आयुष्यात आलीस अन हृदयाच्या सिंहासनावर स्थानापन्न झालीस…अगदी कायमचीच…
सागरात विसावणाऱ्या सांजवेळच्या तांबड्या बुंद रवीच्या साक्षीने सागरतटीच्या विशाल खडकांवर तांबडं लेवूनी कितीतरी संध्याकाळी अजरामर केल्या आपण…तांबडं पांघरलेलं तुझं चंद्रावानी खुललेलं रूप वेडावून सोडायचं…डाळिंबासारख्या गडद लाल ओठांवरचं प्रसन्न हास्य खुणावत असायचं…..ते डाळिंब दाणे टिपण्यासाठी…. अन मधुररस प्राशन करून तुझ्यातच विरून स्वतःला विसरून जाण्यासाठी…
तू मंत्रमुग्ध केलंस तुझ्या गंधाने….मोहून टाकलंस तुझ्या अलौकिक सौंदर्याने…तुझ्या केसांच्या बटा रेंगाळायच्या गुलाबी गालांवर…तू तुझ्या नाजूक बोटांनी दूर करायचीस त्यांना…अन तुझ्या गुलाबी रंगावर अगदी माझ्यासारख्याच भाळलेल्या केसांच्या बटा जवळीक साधायच्या…तुझ्या मनाला गुदगुल्या करून शहारून सोडायच्या….
तुझे सौंदर्य अवर्णनीय तर होतंच…. पण तुझ्या अंतरंगातील गुणांमुळे तू मला अति प्रिय होतीस…तुझं मधाळ बोलणं….दुःखांना गाडून सुखात जगणं… सर्वकाही विलक्षण असायचं….दिवसभराचा शीण क्षणात निघून जायचा….
सागराच्या लाटांचे तुषार पायांवर झेलत….तुझ्या मांडीवर डोकं ठेऊन खुशाल आकाशातील तारे न्याहाळत असायचो अन तुलना करायचो…. निळ्या आभाळात दिसणाऱ्या चंद्रकोरीची….. माझ्या सहवासात….माझ्या मिठीत असणाऱ्या चंद्रकोर मुखड्याशी… असंख्य तारका वेढा घालून असायच्या चंद्राच्या भोवती अन मी एकटाच पहुडलेला असायचो तुझ्या मांडीवर….तुझी नाजूक बोटे फिरत असायची नाजूकपणेच माझ्या रेशमी केसांतून…मी मात्र स्वप्नात असल्यासारखा….वेडावून जायचो तुझ्या मिठीत…. अन वाटायचं….. हा मखमली कवडसा असाच राहू दे आयुष्यभर माझ्या भोवती….स्वप्नात जगण्यासाठीच…..!!!
©[दिपी]✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६