मालवण :
घरात स्वयंपाक करीत असताना आगीचा भडका उडाल्याने महिला गंभीररीत्या भाजल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या कोळंब – रेवंडी येथे सुमारास घडली. श्रीमती हेमांगी हेमकांत मेथर (५२) असे या महिलेचे नाव आहे. या दुर्घटनेत श्रीमती मेथर या भाजल्या आहेत. मालवण ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रेवंडी येथील श्रीमती हेमांगी मेथर या शनिवारी दुपारी घरातील स्वयांपाक खोलीत स्वयंपाक करत होत्या. त्यांची मुलगी बाहेरच्या खोलीत बसली होती. यावेळी स्वयंपाक खोलीत आगीचा भडका उडाल्याने हेमांगी या आगीत भाजल्या गेल्या. मुलीने पाण्याच्या मदतीने हेमांगी यांना लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु हेमांगी या आगीत भाजल्याने त्यांना रुग्णवाहिकेने मालवण ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी हेमांगी यांच्यावर प्राथमिक उपचार केले. परंतु त्या १०० टक्के भाजलेल्या असल्याने त्यांना तात्काळ १०८ रुग्णवाहिकेने गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले. या घटनेची माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फारणे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.