*सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचा बहुमान*
सिंधुदुर्ग जिल्हा आणि मुंबई पुणे कोल्हापूर बेळगाव गोवा राज्य तसेच वेळप्रसंगी अन्य जिल्ह्यातील मित्र सदस्यांच्या मदतीने ‘रक्तदान अवयवदान देहदान व रुग्णमित्र’ चळवळीत मोलाचे योगदान देणारी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ही जिल्हावासीयांची नोंदणीकृत संस्था आहे.
आता पर्यंत संस्थेने अनेक रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्त उपलब्ध करुन दिले आहे. अनेक रक्तदान शिबिरे आयोजीत केली आहेत, प्रत्येक महिन्यात ८ ते १० शिबिरे हे लक्ष्य ठेऊन संस्था काम करत आहे. अवयवदान देहदान या संदर्भानेही संस्था जनजागृती करत आहे या जागृतीला चांगला प्रतिसादही मिळू लागला आहे.
रुग्णमित्र म्हणून रुग्णाच्या अडचणी सोडविण्या बाबतही संस्थेने कार्य केले आहे.
या सर्व कार्याची दखल महाराष्ट्रभरातून अनेक नामवंत व्यक्ती व संस्थांनी घेतली आहे. याच प्रकारची दखल नॅशनल फेडरेशन ऑफ व्हॉलंटरी ब्लड डोनर्स ऑर्गनायझेशन (इंडिया) या संस्थेने घेतली आहे, या संस्थेने सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानशी संपर्क साधून प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती घेतली व या माहितीने प्रभावित होऊन संस्थेला महाराष्ट्र राज्यातुन पहिले सदस्य करुन घेतले. अनेक राज्यांतील ऐच्छीक रक्तदान संस्थाना सदस्य करुन घेत असताना महाराष्ट्रातुन हा बहुमान सिंधु रक्तमित्रला मिळाला आहे. फेडरेशनने सदस्यत्व देत असतानाच महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी सिंधु रक्तमित्रचे जिल्हा सचिव श्री किशोर नाचणोलकर यांची नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या ३६ जिल्ह्यातील रक्तदान चवळीतील संस्थाची सदस्य म्हणुन निवड करुन महाराष्ट्र राज्याची कार्यकारीणी तयार करण्याची जबाबदारीही नॅशनल फेडरेशन ऑफ व्हॉलंटरी ब्लड डोनर्स ऑर्गनायझेशन (इंडिया)चे अध्यक्ष मा.श्री.भुपेंद्र देव (गुजरात) यांनी किशोर नाचणोलकर यांच्यावर सोपवली आहे.
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानला मिळालेला हा फार मोठा बहुमान आहे, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान संस्थेचे तसेच फेडरेशनच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष किशोर नाचणोलकर यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन करण्यात येत आहे.