वाळूचे दर कमी हा राज्यासाठी निर्णय ;चोरट्या वाळूप्रश्नावर आमदार गप्प का ? – मनसेचा सवाल
मालवण (प्रतिनिधी ) :-
गगनाला भिडलेल्या वाळूच्या दरामुळे सर्वसामान्यांना वाढीव दराने वाळू खरेदी करण्याची वेळ आली होती.त्यामुळे शासन स्तरावरून वाळूचे दर कमी करण्यात आले आहे.संपुर्ण राज्यासाठी शासनाने घेतलेला हा निर्णय आहे.विधानसभेत जिल्ह्याच्या वाळूदर विषयावर कधी न बोलणार्या आमदार वैभव नाईक यांनी स्वत: श्रेय घेवू नये.अशी टीका मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे.
आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वाळूदर कमी केले असे आमदार जनतेला भासवत आहेत.विधानसभेच्या सभागृहात अन्य जिल्ह्यातील आमदारांनी चोरट्या वाळूबाबत आवाज उठवला होता तेव्हा आम.नाईक गप्प होते.
आमदार वैभव नाईक यांना फुकाचे श्रेय घेत स्वत:चा सत्कार स्वत: करून घ्यायची जुनी सवय आहे.या अगोदर एलईडी मासेमारीवर बंदीचा निर्णय केंद्र शासनाकडून घेण्यात आला होता त्याचेही श्रेय आम. नाईक यांनी घेतले होते.
राज्यातील नदी व खाडी पात्रातील वाळू, रेती उत्खननाबाबतचे आता असलेले धोरण रद्द करून, जनतेस माफक दरात वाळू मिळावी या दृष्टीने वाळू, रेती उत्खननाबाबत सर्वंकष असे सुधारित धोरण लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत नुकताच घेण्यात आला.राज्यात नदी पात्रातील व खाडी पात्रातील वाळू, रेती निष्कासनासाठी शासन निर्णय दि. ३०/०९/२०१९ व दि. २१ /०५ /२०१५ अशा या दोन शासन निर्णयांद्वारे धोरण निश्चित करण्यात आले होते. हे धोरण रद्द करण्यात येवून नवीन धोरण मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले.
त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी फुकाचे श्रेय घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वाळूदर आपणामुळेच कमी केले गेले असे जनतेला भासवण्याचा प्रयत्न करू नये असेही मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केले आहे.