सिंधुदुर्ग
शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित राकेश परब याला मंगळवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली. संशयितातर्फे ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
आमदार नितेश राणे यांचा पीए राकेश परब याने संतोष परब हल्ला प्रकरणी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर सोमवारी राकेश परब कणकवली पोलिसांत हजर झाला होता. सायंकाळी त्याला अटक करून मंगळवारी सकाळीच न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी 14 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली. राकेश परब याने आयफोन मोबाईलच्या फेस टाईम या ॲप्लिकेशन वरून अटकेत असलेला आरोपी सचिन सातपुते यास फोन करून ‘तुम्ही हा प्रकार आता करायला नाही पाहिजे होता.’ असे म्हणाल्याने त्याचा तपास करण्यासाठी आयफोन जप्त करावयाचा आहे, यासह एकूण अकरा मुद्द्यांवर पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. यावेळी अॅड. उमेश सावंत यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने परब याला ४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली.