You are currently viewing पर्यटन विकासासाठी सिंधुदुर्ग जिल्हा केंद्र सरकारकडून दत्तक

पर्यटन विकासासाठी सिंधुदुर्ग जिल्हा केंद्र सरकारकडून दत्तक

केंद्र सरकारच्या निर्णयामुळे जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रात क्रांतिकारी बदल शक्य : बाबा मोंडकर

मालवण

पर्यटन विकासासाठी सिंधुदुर्ग जिल्हा केंद्र सरकारने दत्तक घेतला आहे. या निर्णयाबद्दल पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने केंद्र आणि राज्य शासनाचे आभार मानण्यात आले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रात क्रांतिकारी बदलाची अपेक्षा महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी व्यक्त केली आहे.

पर्यटन विकासासाठी राज्य सरकारने केंद्राकडे पाच जिल्ह्यांबाबत मागणी केली होती. त्यापैकी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकसित करण्यासाठी केंद्राने दत्तक जिल्हा म्हणून घोषित केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा या पूर्वीच पर्यटन जिल्हा जाहीर झाला आहे. आता केंद्राने हा जिल्हा दत्तक घेतल्याने येथील पर्यटन विकास होऊन पर्यटनामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने केंद्र आणि राज्य शासनाचे आभार मानण्यात आले आहेत.

याबाबत महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्य सरकारने १९९९ साली पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा जाहीर केला. परंतु जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळ लोटूनही ज़िल्ह्याच्या पर्यटन विकासात सरकारचे अधोरेखित होईल असे योगदान नाही. जिल्ह्यातील पर्यटन भारताच्या, जगाच्या नकाशावर पोहोचविण्याचे महत्वाचे कार्य हे जिल्ह्यातील स्थानिक व्यावसायिक, पर्यटन व्यावसायिक यांचे आहे. सरकारची कुठलीही मदत नसताना पर्यटन व्यवसाय उभा करण्यास शासनाची कुठलीही पॉलिसी, अनुदान नसताना स्थानिकांनी स्वबळावर पतसंस्था, शेड्युल बँक, सावकारी जास्त दराने कर्ज घेऊन पर्यटन क्षेत्रात कार्य करून जिल्ह्याचे नाव देशविदेशात पोहोचविले. केंद्र सरकारने सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विषयासाठी दत्तक घेतल्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यातील बीच, कल्चर, ऍग्रो, मेडिकल, हिस्ट्री, फूड टुरिझम क्षेत्रात वाढ होण्यास मदत होईल तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी राज्य व केंद्र सरकार कडून स्थानिकांस आवश्यक टुरिझम पॉलिसी बनेल. तसेच गेले दोन वर्षे नैसगिक आपदा, कोरोना सारख्या महामारीमुळे उध्वस्त झालेल्या पर्यटन व्यावसायिकांस नक्कीच बळ मिळेल, अशी महासंघास अपेक्षा वाटते. आज जिल्ह्यात सागरी पर्यटन क्षेत्रात वाढ होत आहे. देशविदेशातील लाखो पर्यटक सागरी पर्यटनासाठी जिल्ह्यामध्ये येत असतात. केंद्र सरकारने पर्यटन विषयी जिल्हा दत्तक घेतल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात खऱ्या अर्थाने सागरी पर्यटनाबरोबर अन्य पर्यटन क्षेत्रात वाढ होईल. यासाठी जिल्हातील व्यावसायिकांनी व सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी समन्वयाची व पर्यटन वाढीची भूमिका ठेवावी. याबद्दल राज्य व केंद्र सरकारचे विशेष अभिनंदन तसेच यामुळे जिल्हातील पर्यटना मध्ये क्रांतिकारक बदलाची अपेक्षा महासंघास आहे, अशी माहिती बाबा मोंडकर यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − fourteen =