राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या प्रयत्नांतून विकासगंगा
कणकवली :
देवघर धरण प्रकल्पात विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांच्या नवीन कुर्ली वसाहत, गावठाण भागातील पाणी पुरवठा, रस्ता आणि नागरी सुविधा आणि धरणाच्या तिर कालव्यांतर्गत कामांसाठी तब्बल 3 कोटी 75 लाख 10 हजारांचा निधी मंजूर झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचे यासाठी मोलाचे सहकार्य लाभल्याचा उल्लेख पिळणकर यांनी केला. येत्या महिन्याभरात या कामाची टेंडर प्रोसेस होऊन प्रत्यक्ष कामांना सुरुवात होईल असे पिळणकर म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, युवक राष्ट्रवादी काँग्रेस उपजिल्हाध्यक्ष अविनाश चव्हाण, युवक तालुकाध्यक्ष सागर वारंग, कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, कृष्णा निकम, रवी होळकर आदी उपस्थित होते. तब्बल 32 वर्षे होऊनही अद्याप 18 नागरी सुविधांपासून कुर्ली गावातील विस्थापित धरणग्रस्त वंचित आहेत.स्थानिक लोकप्रतिनिधी विकासकामांची केवळ शाब्दिक आश्वासने देतात, मात्र प्रत्यक्षात मंत्र्यांकडे पाठपुरावा करत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्याकडे आपण गेली 11 वर्षे या सुविधांसाठी पाठपुरावा करत आहे. त्यानंतर विद्यमान खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे सातत्याने आपण केलेला पाठपुरावा कामी आला आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची यासाठी 2 वेळा प्रत्यक्ष भेट घेऊन पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच एकूण 3 कोटी 75 लाख हुन अधिक विकासनिधी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज प्राप्त झाला आहे. हा विकासनिधी मंजूर करून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे पिळणकर म्हणाले. केवळ श्रेय घेण्यासाठी पुढे पुढे करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी असा निधी आणावा असा टोलाही यावेळी पिळणकर यांनी लगावला.मंजूर झालेला विकासनिधी पुढीलप्रमाणे आहे. नवीन कुर्ली वसाहत पाणीपुरवठा योजनेसाठी मनुष्यबळ पुरवणे 8 लाख, लोरे गावातील पुनर्वसन गावठाण मध्ये पथदीप बसवणे, फोंडाघाट गावठाण मधील स्ट्रीट लाईटसाठी 3 लाख 47 हजार, नवीन कुर्ली वसाहत मधील शाळा दुरुस्ती 1 लाख 46 हजार, विहिरीतील गाळ काढणे 2 लाख 81 हजार, पोहोच व अंतर्गत रस्ते साफसफाई 3 लाख 35 हजार, पाणीपुरवठा योजनेसाठी पर्यायी पंप बसवणे 2 लाख 45 हजार, पुनर्वसन गावठाण नवीन कुर्ली वसाहतीस पाणीपुरवठा नळयोजनेचे मजबुतीकरण करणे 99 लाख 58 हजार असा एकूण 1 कोटी 35 लाख निधी नागरी सुविधांसाठी मंजूर झाला आहे.तर देवधर धरणाचा डावा तिर कालवा आणि उजवा तिर कालवा अंतर्गत एकूण 2 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.