You are currently viewing माडखोल ग्रामस्थांचे उपोषण स्थगित

माडखोल ग्रामस्थांचे उपोषण स्थगित

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांची यशस्वी शिष्टाई

सावंतवाडी
ग्रामस्थ्यांच्यावतीने प्रजासत्ताकदिनी तेथील धरण परिसरात आयोजित केलेले सामुहिक जलसमाधी आंदोलन स्थगित करण्यात आले‌. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, तहसीलदार राजाराम म्हात्रे, कार्यकारी अभियंता सिंधुदुर्ग पाटबंधारे गोविंद श्रीमंगले यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, माडखोल लघु पाटबंधारे योजनेच्या उजव्या व डाव्या कालव्यांची पुनर्स्थापनेची फार्म प्रगतीपथावर आहे. योजनेच्या डाव्या कालव्यावर ठेकदार चंद्रकांत बिले यांचे काम सद्यःस्थितीत प्रगतीपथावर असून आजमितीस सिंचनासाठी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आलेले आहे. तथापि, काम करताना उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणीवर मात करून लाभधारक शेतकऱ्यांना सुरळित पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने ठेकेदारास वारंवार सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत. मे. बी. आर. सुकळे, कन्स्ट्रक्शन यांना उजव्या कालव्याचे रु. ५० लक्ष इतक्या रकमेचे काम दिले असून त्यापैकी रु.२५ लक्ष इतक्या पाईप किमतीची रक्कम श्री. सुकळे ठेकेदार यांना अदा केलेली आहे. पाईप पाटबंधारे उपविभाग, सावंतवाडी यांचे चराठे येथिल कार्यालयाच्या आवारात सुस्थितीत व सुरक्षित ठेवण्यात आलेले आहेत.
श्री. सुकळे, ठेकेदार यांना यापूर्वी लेखी सूचनापत्र देऊनसुद्धा त्यांनी क्षेत्रिय स्तरावर पाईपलाईन काहीच काम केलेले नाही. त्याच्या या कामातील उदासीनता पाहता या विभागाचे पत्र शर्तीनुसार अंतिम करण्यात आले आहे. अंदाजपत्रकाप्रमाणे शिल्लक काम हे पाणी वापर संस्थेचे संचालक, लाभधारक शेतकरी यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनानुसार त्यांना ज्या ज्या ठिकाणी काम करणे आवश्यक व गरजेचे आहे. त्यानुसार त्यांचे सहमतीने नविन अंदाजपत्रक तयार करून त्याम मान्यता घेऊन आणि निविदा प्रक्रिया राबवून माहे एप्रिल २०२२ पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे लाभधारक शेतक-यांना सिंचनासाठी मुबलक आणि सुरळीत पाणीपुरवठा होईल, याची हमी हे कार्यालय देत आहे.
त्यामुळे, जलसमाधी आंदोलन रद्द करून अशा प्रकारच कोणते कृत्य न करता सहकार्य करावे अशी विनंती पाटबंधारे विभागान केली. तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच याबाबत लक्ष वेधणार असल्याचा शब्द दिला. यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी देखील यासाठी विशेष मेहनत घेतली. यावेळी आंदोलनकर्ते राजकुमार राऊळ, सुर्यकांत राऊळ, संजय लाड यांसह बावतीस फर्नांडिस, इफ्तिकार राजगुरू, संतोष जोईल यांसह पोलिस मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा