You are currently viewing रजनी …
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

रजनी …

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित ज्येष्ठ लेखिका प्रा.सौ सुमती पवार यांचा लेख

थक्क आणि स्तिमित झाले मी …
रजनी चे इतके सुंदर आणि प्रभावी वर्णन
पहिल्यांदाच वाचले मी , नि रजनी ची ताकद
लक्षात आली .. पदार्पणातच सिक्सर ठोकणारी…

 

रजनी .. रात्र.. किती सुंदर नक्षत्रे ताऱ्यांनी
चमचमणारी .. चंद्राला दिमाखात मिरवणारी..
सुखद शीतल शांत निवांत नीरव अंगाई गात
समस्त जगताचा श्रम परिहार करणारी, विश्रांती
देऊन नव्याने उद्यासाठी उर्जा देणारी …

 

चांगले वाईट काळे बेरे सारे पदरात घेऊन झाकून
टाकणारी .. अस्वस्थ माणसाचा दिलासा.. तात्पुरता
का होईना सुटकेचा क्षण …
पक्षी तारे वारे नक्षत्रे माणसे यांना कवेत घेऊन कोणताही
भेदाभेद न करता जोजवणारी प्रेमळ विश्वमाताच जणू …
तिच्या सारखी तिच .. असंख्य रहस्ये पोटात दडवून
शांत चेहऱ्याने मिरवणारी विदुषीच …

 

खरेच .. कोण टाळू शकते , अव्हेरू शकते या रजनीला ..
योगी आणि कवींची लाडकी … ती येणार हे त्रिकालाबाधीत
सत्य .. तुमची इच्छा असो वा नसो..संध्याछाया पसरणारंच..
तिच्या गर्भात सूर्य ही गडप होणार एवढी तिची ताकद असली
तरी.. तो प्रकटणार नव्या तेजाने ..उत्साह उर्जा ती ही पराकोटीची… घेऊन तो येणार ..!
“ म्हणूनच .. उगाच नाही म्हटले…रात्रीच्या गर्भात असे हो
उद्याचा उष:काल…” रात्र येणार नि सरता सरता नव्या आशांचा
आकांक्षांचा सूर्य प्रकटणार..नवे तेज जगावर पसरणार …

 

तिचे येणे सुखदायक .. शांत क्लांत लोकांना दिलासा देणारे.
उद्याचे उद्या पाहू .. आता झोपा .. क्षणात साऱ्या चिंता दु:ख्खे
कवेत घेऊन राव रंक उच्च निच झोपडी महाल असा भेदभाव न
करता आपल्या पांघरुणात घेऊन गुडूप निजवणारी..पापण्यांवर परी सारखी अलगद उतरणारी,
सुंदर स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणारी, मनातील अतृप्त
इच्छा स्वप्नात पुरवणारी जणू कल्पवृक्षच …
( निद्रानाशाचे बळी .. त्यांना विचारा रात्रीचे दु:ख्ख)

अशा तिची संध्याछाया पसरू लागताच सारे तिची आतुरतेने वाट
पाहू लागतात .. गाई गुरे वासरे पक्षी कोटऱ्याकडे धावतात.
वासरे लुचू लागतात.पक्षी पिलांना पंखाखाली घेतात.
डोळे मिटतात व डुलक्या काढतात .. थकवा पार निघून जातो.
फटफटताच भरारी मारण्यासाठी सज्ज होतात .
रजनी .. दिसायलाही किती देखणी .. नक्षत्रांची खडीची चंद्रकला नेसून चंद्र ताऱ्यांच्य झुंबरांच्या महालात फक्त
स्वत:ची मिजास मिरवणारी .. समस्त जगतावर हुकुमत
गाजवणारी,एकछत्री अंमल असणारी , पऱ्यांच्या सहवासात
रमणारी.. दवबिंदूंचे अश्रू ढाळणारी.. कदाचित रात्रंदिवस
पोटामागे धावणाऱ्यांचे दु:ख्ख पाहून अशी एकट्याने रडून
घेत असावी.. तरारणाऱ्या गवताला सोबत घेऊन त्यांवर
आपले दु:ख्ख सांडणारी श्रमिकांचे सांत्वन करणारी विश्व
जननी माताच …

 

अशा सौंदर्यवतीला नावे ठेवतांना हजार वेळा आपण विचार
करायला हवा .. ती नसेल तर .. जरा विचार करूनच पहा ..
आळस झटकून उठणारंच नाही नि प्रसन्नतेने तुमचा
दिवस ही सुरू होणार नाही ..
तुमच्या सकाळच्या प्रसन्नतेचे कारणही ही सौंदर्यवती रजनीचं
आहे ..
मग .. इथून पुढे रात्रीच्या नावाने खडे फोडणे बंद …

ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : २१ जानेवारी २०२२
वेळ : संध्या : ५ : ४५

प्रतिक्रिया व्यक्त करा