You are currently viewing संदर्भ ग्रंथ : अमृत मंथन

संदर्भ ग्रंथ : अमृत मंथन

✒️ *प्रकरण : सुख-दुःख.*

जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य हा मरेपर्यंत जगतो व जगत असताना त्याची जीवन-नौका सुख-दुःखाच्या लहरीवर हेलावत असते. *प्रत्येकजण सुख मिळविण्याचा व दुःख टाळण्याचा कसून प्रयत्न करीत असतो.परंतु सामान्यपणे, सामान्य माणसाचा अनुभव असा की, हा प्रयत्न करीत असता सुख जाते दूर व दुःख मात्र पदरात पडते. वास्तविक,सुख-दुःखाला कारण आपले कर्मच असते,परंतु सुख मिळाल्यास माणूस त्याचे श्रेय स्वत:कडे घेतो व दु:ख प्राप्त झाल्यास त्याची जबाबदारी तो दुसऱ्या कुणावर तरी ढकलतो. पापाचे फळ दु:ख व पुण्याचे फळ सुख असे सुख-दु:खाचे सरळ गणित आहे.*
परंतु माणसाच्या मर्यादित आयुष्यामुळे त्याने केलेल्या अमर्यादित कर्मांच्या पाप-पुण्यांचे हिशेब त्याला त्याच आयुष्यात चुकते करता येत नाहीत.याचा प्रत्यक्ष परिणाम असा होतो की,पुण्य करून सुद्धा दु:ख व पाप करून सुद्धा सुख मिळाल्याचे दृष्य माणसाच्या आयुष्यात अनुभवाला येते.वास्तविक हे दृष्य अत्यंत फसवे असते.जसे ‘बी’ तसे झाड;इतकेच नव्हे तर त्या झाडाला फळ केव्हां येणार हे सुद्धा त्या ‘बी’ च्या जातीवर अवलंबून असते.काही झाडे एका वर्षात तर काही झाडे दोनशे वर्षानंतर सुद्धा फळं देणारी असतात.या दोन प्रकारच्या झाडांमध्ये जास्त काळांत फळं देणारी अनेक प्रकारची झाडे असतात.त्याचप्रमाणे माणसाच्या हातून जी कर्मे घडतात ती निरनिराळ्या जातीची असतात व म्हणून त्यांना येणारी फळे सुद्धा कमी-जास्त काळात निर्माणl होतात. समजा,एखाद्या माणसाचे आयुष्य (Span of Life) फक्त तीस वर्षांचे आहे व त्याने केलेल्या कमी
कर्मांच्या जाती अशा आहेत की,ती कर्मे पन्नास वर्षानंतर फळं देतील. अर्थात्,तीस वर्षांचे आयुष्य असल्यामुळे त्याच आयुष्यात त्याला पन्नास वर्षानंतर फळणाऱ्या कर्मांची बरी-वाईट फळे चाखता येणार नाहीत. आता ही ‘फळांची’ जी बाकी (Balance) उरली आहे ती तर त्याने भोगलीच पाहिजे,कारण “क्रिया तशी प्रतिक्रिया’ (Action and reaction are equal and opposite) हा निसर्गाचा नियम आहे.त्यासाठी त्याला त्या कर्मांची फळे पुढे येणाऱ्या जन्मात भोगावी लागतात. *नवीन जन्म व भोग मागील जन्मातील कर्मफळांचा, यांचा परस्पर मेळ सामान्य माणसाला न घालता आल्यामुळेच त्याच्या जीवनात वैचारिक गोंधळ निर्माण होतो.*

💡 *इथे एक मुद्दा उपस्थित होण्याचा संभव आहे व तो म्हणजे मागील जन्मात घडलेल्या कर्मांची जबाबदारी या चालू जन्मात का?*

✅ त्याला उत्तर एवढेच की, काल केलेल्या बऱ्या वाईट कर्मांची जबाबदारी आज व आज केलेल्या कर्मांची जबाबदारी उद्या याप्रमाणे माणसाला घ्यावीच लागते, त्याचप्रमाणे आधीच्या जन्मातील कर्मफळ भोग सध्याच्या म्हणजे चालू जन्मात माणसाला भोगावाच लागतो.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की,सुखाचा भोग घेताना पुण्याचा क्षय होतो व दुःख भोगा नंतर पापाचा क्षय होतो.सुखाच्या सुस्थितीत जगत असताना सामान्यपणे माणूस उर्मट व उन्मत्त होतो व दुसऱ्यांचा अपमान व तिरस्कार करण्यात व त्यांना त्रास देण्यात त्याला एक प्रकारचा (आसुरी) आनंद होतो.त्यामुळे ‘आज’ सुखी असणाऱ्या माणसाचा एका बाजूने पुण्यक्षय तर दुसऱ्या बाजूने पापसंचय होतो व गांठी असलेल्या पुण्याचा क्षय झाल्यावर त्याच्यावर एका मागून एक दु:खाचे आघात होऊ लागतात.याच्या उलट दुःखाच्या दुःस्थितीत जगत असताना (अपवादात्मक उदाहरणे सोडल्यास) माणूस सहजच नम्र व विनयशील होतो व इतरांबद्दल त्याला आदर व आपलेपणा वाटतो.त्यामुळे ‘आज’ दु:खात असणाऱ्या माणसाचा एका बाजूने पापक्षय होतो व दुसऱ्या बाजूने पुण्यसंचय होतो,व गांठी असलेल्या पापांचा क्षय झाल्यानंतर
त्याच्या जीवनात एकामागून एक सुखाचे प्रसंग येऊ लागतात.

🎯 *अशा रीतीने सुख-दुःखाच्या पाठशिवणीचा खेळ माणसाच्या जीवनात सदैव चालू असतो आणि म्हणूनच दुःखाच्या दुःस्थितीत माणसाने प्रतिकूल परिस्थितीने खचून न जाता नम्र व विनयशील राहून अनुकूल परिस्थितीची शांतपणे वाट पहाणे त्याच्या हिताचे असते. त्याचप्रमाणे सुखाच्या सुस्थितीत माणसाने उर्मट व उन्मत्त न होता अनुकूल परिस्थितीच्या उपभोगाने होणारा पुण्यक्षय लक्षात घेऊन तो जनसेवेच्या किंवा उपासनेच्या द्वारा भरून काढण्याचा सतत प्रयत्न करणे त्याच्या हिताचे असते.*
🎯 *सर्व उपासनेत नामस्मरण ही उपासना श्रेष्ठ व सुलभ असून तिच्या द्वारे अगणित पुण्याची प्राप्ती करून घेता येते.म्हणून पुण्यक्षय भरून काढण्यासाठी व पुण्य वाढविण्यासाठी नामस्मरणाचा छंद लावून घेणे आपल्या हिताचे आहे.*
🎯 *पुण्यक्षय भरून काढण्यासाठी आणखी एक सुलभ व उत्कृष्ट उपाय आहे, तो म्हणजे मनाने कोणाचेही वाईट न चिंतिणे व इतरांचे कल्याण व्हावे असे मनापासून वाटणे.“चिंती परा ते येई घरा’ अशी एक उत्कृष्ट म्हण आहे.दुसऱ्यांचे वाईट व्हावे, त्यांचे अकल्याण व्हावे अशी जे इच्छा करतात त्यांचा एका बाजूने पुण्यक्षय होतो व दुसऱ्या बाजूने पापसंचय होतो. परिणामी असे करणाऱ्या लोकांच्या वाट्याला नेमक्या त्याच गोष्टी येतात. याच्या उलट सर्वांचे कल्याण व्हावे, सर्व सुखी व्हावेत,सर्वांचे भले व्हावे, अशी जे मनापासून प्रार्थना करतात त्यांच्या पापांचा क्षय होतो व पुण्यसंचय होऊन परिणामी त्यांना त्याच गोष्टी प्राप्त होतात.म्हणून*

तुकाराम महाराज उपदेश करतात,

न घडो कोणाही भूताचा मत्सर। वर्म सर्वेश्वर पूजनाचे।।

ज्ञानेश्वर महाराज प्रार्थना करतात,

सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईजे।।

*~ सद्गुरु श्री वामनराव पै.*

प्रतिक्रिया व्यक्त करा