*प्रश्न ७ : माणसे व्यसनाधीन होतात किंवा दुराचार, अनाचार, भ्रष्टाचार, अत्याचार करतात. या सर्व गोष्टींचा परमेश्वराच्या जिवंत मूर्तीशी काही संबंध आहे का?*
*उत्तर :* दारु, तंबाखू, गुटखा, अफू, गर्द, ब्राऊनशुगर वगैरे अनिष्ट व्यसनांच्या आहारी जाऊन माणसे परमेश्वराच्या शरीररुपी जिवंत मूर्तीची भयंकर विटंबना करीत असतात, म्हणजे प्रत्यक्षात ही माणसे परमेश्वराचा अपमान व अवमान करीत असतात. त्याचप्रमाणे दुराचार, अनाचार, भ्रष्टाचार, अत्याचार व खून-रक्तपात करून माणसे परमेश्वराच्या शरीररुपी जिवंत मूर्तीचे हालहाल करतात व मोडतोड करतात. अशी दुष्कर्मे करणारी माणसे, परमेश्वराच्या दरबारात भयंकर गुन्हेगार ठरतात. येथे जीवनविद्येचे महत्वाचे सिद्धांत सदैव लक्षात ठेवले पाहिजेत. *”तुम्ही जेव्हां दुसऱ्यांना सुख किंवा दुःख द्याल तेव्हां ते सुख-दुःख तुमच्याकडे बुमरँग होऊन सहस्त्रपटीने परत येईल, हा निसर्गाचा अटळ नियम आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हां इतरांना सुख देण्याचा प्रयत्न कराल तेव्हां ते सुख तुमच्या घरी पाणी भरेल, याच्या उलट तुम्ही स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्यांना दुःख द्याल, तर ते दुःख तुमच्या डोळ्यातून पाणी काढेल.”* थोडक्यात, अनिष्ट गोष्टी करून माणसे प्रत्यक्षात महापाप करीत असतात. ‘पाप तेथे ताप’ हे ठरलेलेच आहे. परिणामी या *”पद्धतशीर व्यवस्थेकडून”* म्हणजेच परमेश्वराकडून, निसर्गनियमाप्रमाणे अनिष्ट प्रतिक्रिया घडून, अशा माणसांच्या जीवनात सर्व प्रकारची भयानक अव्यवस्था निर्माण होते. याचाच अर्थ असा की, अशा अनिष्ट गोष्टी करणाऱ्या माणसांना, शारीरिक रोग, मानसिक रोग, आपत्ती, विपत्ती, संकटे, टेन्शन, दु:ख वगैरे अनिष्ट गोष्टींना सामोरे जावे लागते. ही माणसे स्वत:चा सर्वनाश करतात, त्यांच्या कुटुंबियांना दुःखाच्या खाईत लोटतात व राष्ट्राचे अपरिमित नुकसान करतात. थोडक्यात, अलौकिक अशा मानवी शरीराची योग्य ती काळजी घेऊन तिची राखण करायची की व्यसनाधीन होऊन व अनिष्ट दुष्कर्मे करून तिची राख करायची, हे सर्वस्वी माणसाच्या हातात आहे.
*~ सद्गुरु श्री. वामनराव पै.*