जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार यांचा लेख
काय सुंदर विषय आहे हो …! कसे सुचतात बुवा
तुम्हाला हे विषय ….
लहानपणी माझ्या ४ आत्या आलटून पालटून भावाकडे
म्हणजे माझ्या वडिलांकडे माहेरपणाला येत असत.
अजूनही लख्ख आठवतात ते दिवस .त्यातली एक आत्या
गोष्टी सांगण्यात फार तरबेज होती.मला अजूनही आश्चर्य
वाटते, एवढ्या गोष्टी तिच्या कशा लक्षात रहात असत .
जेवणे आटोपली की बाहेर पडवीत (कापडण्याला ..माझ्या
माहेरी)अंथरूणे घातली की, तिला चिकटून आम्ही बाल गोपाल मंडळी ओळीने झोपत असू … हो.. कारण गोष्टीत
चेटकिणही असे नि तिची मनात भयंकर दहशत होती.
आत्या अगदी घोळवून घोळवून गोष्ट सांगायची नि आम्ही
हं .. हं… म्हणून प्रतिसाद देत असू..
हळू हळू झोपेचा अंमल चढून आम्ही गोष्टीच्या राज्यात
केंव्हा जाऊन पोहोचत असू ते आम्हाला ही कळत नसे. नि
आमचा प्रतिसाद थांबला की, आत्याची गोष्ट तेथेच थांबत
असे. बघा … जोवर प्रतिसाद होता तोवर गोष्ट चालू होती, नि
प्रतिसाद थांबताच गोष्ट ही तेथेच थांबली.. अपूर्ण होती तरी …
भले ती गोष्ट दुसऱ्या दिवशी रात्री जिथे थांबली तिथून सुरू
होई … पण प्रतिसाद थांबताच गोष्ट थांबत असे …
……. समजले नां …..
माहेरपणाला आलेल्या नणंदा त्या .. मग काय? रोज
आईच्या हातच्या या नवनवीन पदार्थांची फरमाईश व्हायची
नि तृप्त मनाने त्या जेवायच्या… पण त्यांना आई ने प्रतिसाद
दिला नसता तर … ? त्या फिरकल्या असत्या का आमच्याकडे ? नाही … नसत्या आल्या.त्या हौसेने यायच्या,
त्यांना यावेसे वाटायचे, कारण माझ्या आईचा त्यांना मिळालेला प्रेमळ प्रतिसाद … आपलं सर्वांचं नातं ह्या प्रतिसादाने जोडले गेले आहे. प्रतिसाद नसेल तर माणूस
काय भिंतीशी बोलेल ? प्रतिसाद नसेल तर बोलणेच थांबते..
अरे .. त्याने मला प्रतिसादच दिला नाही .. मग मी काय बोलणार …?आपण बोललेले कोणी तरी ऐकते आहे , प्रतिसाद देते आहे म्हणून आपण बोलतो. प्रतिसादा अभावी
बोलणेच खुंटते ….
आता मी लिहिलेल्या कविता मी अनेक ग्रूपवर टाकते. भरभरून
प्रतिसाद मिळतो.काही भरभरून स्तुती करतात व काही मोजकेच लिहितात .. असते .. प्रत्येकाची आपली पद्धत ..
एका ग्रूपवरून अनेक ग्रूपवर महाराष्ट्रभर कविता फॅारवर्ड होतात व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अगदी कोल्हापूर
सातारा सांगलीच्या खेड्यापाड्यातून मला फोन येतात ,
तुमची अमुक कविता वाचली , छान आहे . काही जण
विस्ताराने प्रतिक्रिया देतात तेव्हा ही मन सुखावते . बघा,
ह्या प्रतिक्रियांचा जीवनात केवढा आनंदाचा ठेवा आहे. मला
मग कळते, मी बरे लिहिते, लोकांना आवडते .. अरे,आपण
अधिक चांगले लिहिले पाहिजे अशी उर्मी निर्माण होते .
प्रतिसाद मग तो लेखनाला असो वा बोलण्यातला असो त्या
शिवाय जीवनाला चवच नाही .अगदी सुमार लेखनालाही व
सुमार बोलण्याला ही आपण प्रतिसादाची अपेक्षा करत असू तर ते मात्र एकदम चुकीचे आहे . अहो .. प्रतिसाद द्या असे
सांगावेच लागत नाही .. चांगले लिखाण , भाषण कानावर
पडले की मुखातून आपोआप शब्द बाहेर पडतात …
वाह .. क्या बात है …जे चांगले आहे तिकडे मन कान इंद्रिये
आपोआप वळतात …
मागून मिळवला तो कसला प्रतिसाद …? प्रतिसाद लाटे
सारखा हवा .. सर्रक्कन् किनाऱ्याकडे धावणारा .. क्षणात
चिंब भिजवणारा … पावसाच्या सळसळ धारांसारखा
अंतर्बाह्य प्रसन्न करणारा …
तर मंडळी .. असे आहे प्रतिसादाचे आपल्या जीवनातले स्थान.. एवढे कशाला आपल्या घरातील नात्यातील
एखादी व्यक्ती अचानक एखादे दिवशी निपचित पडते..
हलत नाही , बोलत नाही … प्रतिसाद देत नाही …
…. कारण … जीवनच तेथे थांबलेले असते ….
ॅंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १७ जानेवारी २०२२
वेळ : दुपारी ३ :१७