वैभववाडी
वाभवे – वैभववाडी न. पं. निवडणुकीत प्रभाग आठ मध्ये अपक्ष उमेदवार रोहन जयेंद्र रावराणे यांनी बाजी मारली आहे. विजयानंतर रोहन रावराणे यांची मिरवणूक लक्षवेधी ठरली. जेसीबी मधून गुलालाची उधळण व पुष्पवृष्टी करण्यात आली. विजयानंतर रोहन रावराणे यांनी वडीलधाऱ्यांचे आशिर्वाद घेतले. नगरसेवक रोहन रावराणे व माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांचे सर्वांनी अभिनंदन केले.
वाभवे – वैभववाडी न.पं. निवडणुकीत भाजपाने 17 पैकी 16 ठिकाणी उमेदवार उभे केले होते. प्रभाग क्रमांक आठ मध्ये भाजपाने कुणालाही उमेदवारी दिली नव्हती. भाजपाचे रोहन जयेंद्र रावराणे व संताजी अरविंद रावराणे यांना अपक्ष निवडणूक लढविण्यास सांगण्यात आले. त्यानुसार दोघांनाही अपक्ष निवडणूक लढविली. झालेल्या अटीतटीच्या लढतीत रोहन रावराणे हे तीन मतांनी विजयी झाले. रोहन रावराणे यांना 38 मते तर संताजी रावराणे यांना 35 मते मिळाली.
या प्रभागात शिवसेनेकडून उभे असलेले माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना देखील मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. संजय चव्हाण यांना आठ मते तर रवींद्र चव्हाण यांना पाच मते मिळाली.
रोहन रावराणे यांनी पाच वर्षे नगरसेवक म्हणून चांगले काम केले आहे.
त्यांनी उपनगराध्यक्ष पद ही भुषविले आहे. पुन्हा एकदा त्यांनी विजय संपादन केला आहे. नगरसेवक रोहन रावराणे यांची वैभववाडी ते एडगांव अशी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक, ग्रामस्थ सहभागी झाले होते.