You are currently viewing नाट्यदेवतेचे पुजारी…

नाट्यदेवतेचे पुजारी…

सावंतवाडी :

आज आणखीन एक दुःखद बातमी ऐकायला आली…स्व.प्रकाश पाटणकर यांचे दुःखद निधन..खरचं हे दिवस फारच क्लेशदायक आणि वेदना देणारे आहेत.

प्रकाश पाटणकर हे नांव उच्चारल की नाट्यक्षेत्रातील आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाट्यचळवळीचा आलेख समोर उभा रहातो.बाबा वर्दम थिएटर हौशी आणि होतकरू नाट्यकलाकारांसाठी एक हक्काच व्यासपीठ. सिंधुदुर्गात कणकवलीचे आचरेकर प्रतिष्ठान आणि कुडाळचे बी.व्ही. थिएटर्स या दोनही नाट्यचळवळीतील अवघ्या महाराष्ट्रातील नावाजलेल्या संस्था.

बाबा वर्दम थिएटरच्या स्थापनेपासून कुडाळात या संस्थेच्या उभारणीत ज्यांच फार मोठं योगदान आहे असे आमचे मित्र श्री चंदू शिरसाट, श्री आनंद सामंतसर आणि यातील तिसरा महत्त्वाचा बिंदू म्हणजे स्व.प्रकाश पाटणकर. कळकीचं बाळ,मैत, अशा आम्ही पाहिलेल्या एकांकिका म्हणजे नाट्यकलेचा अविस्मरणीय अविष्कार. बाबा वर्दम थिएटर्सची कोणतीही कलाकृती ही पाहिल्यावर व अनुभवल्यावर वर्षानुवर्षे त्या कलाकृतीचा प्रभाव आपल्या मनावर टिकून रहातो.हेच त्या कलाकृतीचे यश..आणि या यशामागे पडद्याआड कष्ट घेणारे, निरपेक्ष भावनेने राबणारे हात. म्हणजे नाट्यवेडे स्व.प्रकाश पाटणकर.

मला साधारण पंचवीस वर्षापूर्वीची घटना आठवते. डिसेंबरचा थंडीचा महिना. आचरेकर प्रतिष्ठानच्या एंकाकिंका स्पर्धेसाठी मी आणि माझा मित्र श्री अमोल केसरकर दोन पात्री “शहाण्याचं घरं शेणाचं” ही एकांकिका घेऊन गेलो होतो. त्यादिवशी बाबा वर्दम थिएटरची पण एकांकिका होती. आम्ही जाताना एसटीने गेलो होतो. आमची एकांकिका संपली तेव्हा रात्रीचे बारा वाजून गेले. त्यानंतर सवा वाजता त्यांची एकांकिका संपली. आमच्या समोर प्रश्न होता परत सावंतवाडीत यायचे कसे? मी पोस्टात नोकरीला, सकाळची ड्युटी. अमोल सामाजिक वनीकरणात नोकरीला. आदरणीय प्रकाश पाटणकर. आपल्या चमूला खास गाडी करून आले होते. मी त्यांना आमची अडचण सांगितली. कोणतेहे आढेवेढे न घेता आपल्या कलाकारांची गैरसोय करुन त्यांनी आम्हाला कुडाळला आणलं. रात्रीचे तीन वाजले असतील. आम्ही तीन तास स्टँडवर थांबणार होतो. पण त्यानी आमची अडचण लक्षात घेऊन आम्हाला आपल्या घरी घेऊन गेले. अंथरूण तयार केल. आम्ही शांतपणे झोपलो. सकाळी उठल्यावर आम्हाला चहा दिला. खरं तर आमची ती पहिलीच भेट. मला तो क्षण जशाचा तसा आठवतो. आज त्यांच्या निधनाची बातमी समजाचं ह्यदयाच्या कप्यात जतन केलेल्यांना आठवणी जागृत झाल्या.

आता बाबा वर्दम थिएटरचा पडदा जेव्हा जेव्हा सरकेल तेव्हा या नाट्यदेवतेच्या पुजाऱ्याची त्यांच्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांना, नाट्यरसिकांना आणि या जिल्ह्यातील नाट्यचळवळीतील प्रत्येकाला स्व.प्रकाश पाटणकर यांचे स्मरण झाल्याशिवाय हा पडदा पुढे सरकणार नाही ….

नाट्यदेवतेचे पुजारी स्व.प्रकाश पाटणकर यानां अटल व.स्नेहप्रिया परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली…

… अँड.नकुल पार्सेकर…
…सावंतवाडी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + seven =