फोंडाघाट
अनेक आरोप- प्रत्यारोप, तर्क-वितर्क आणि प्रशासकीय प्रलंबामुळे रेंगाळलेल्या फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक 30 जानेवारी 22 रोजी, नुकत्याच झालेल्या विद्यमान कार्यकारिणी सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी घोषित केली. आणि अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधण्याची चढाओढ सुरू केली.
सध्याच्या १५ संचालकांच्या कार्यकारिणीतील ८ संचालकांनी फारकत घेऊन नवीन पॅनेल तयार केले. तर उर्वरित ७ संचालक, आपण केलेल्या संस्थेच्या विकास कामावर ठाम राहून, नवीन काम करणाऱ्या चेहऱ्यांना आपल्या पॅनेलमध्ये संधी दिली आहे. सर्व फोंडाघाटवासिय आणि संस्थेच्या सदस्यांनी, गेल्या ६८ वर्षे ज्या बुजुर्ग माजी संचालकांनी शाळेच्या गेट मध्ये कोणत्याही राजकीय पक्षाची पादत्राणे आणली नाहीत, याचे स्मरण निवडणूक पॅनेल्सना करून दिले. मात्र आज तयार झालेल्या पॅनल्स मधील विभागणी, शिक्षणप्रेमी उमेदवारांपेक्षा भाजप आणि महाविकास आघाडीची मोट बांधल्याचे चित्र दिसत आहे.
बाशिंग बांधलेल्या उमेदवारांमध्ये वैयक्तिक मतभेदामुळे दुरावलेले, तीन- तीन वेळा पराभूत होऊनही पुन्हा केवळ बोर्डवर नांव लागावे या अपेक्षेने तर काहीजण आपल्या आई वडिलांच्या अपेक्षांना तिलांजली देताना, पाल्याच्या पालकांचे शैक्षणिक भविष्य उज्वल(?) करण्यासाठी उभे राहिले आहेत. विद्यमान पॅनेल्स मात्र आपण केलेली गेल्या पाच वर्षातील कामे आणि त्यांच्या पूर्णत्वासाठी पुन्हा उभे असल्याचे मुद्दे, विरोधकांच्या आरोपांना उत्तर न देता स्पष्ट करीत आहेत..
त्यामुळे राजकीय पक्षाचा अखेर शिरकाव झालेली ह्या निवडणूकीकडे, शेवटच्या दोन रात्री प्रचार यंत्रणा कशी राबविली जाते, याकडे सर्वसामान्य मतदार लक्ष ठेवून आहेत. विद्यमान पॅनेल्स आणि विरोधी पॅनलचे शैक्षणिक मुद्दे पुन्हा एकदा विवादात अडकल्याचे चित्र असून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याची कसरत, प्रत्येक उमेदवाराची सुरू झाली आहे.
वस्तुतः पॅनेल दोन अथवा अनेक असली तरी त्यातील १५ उमेदवारांची निवड मतदार मोठ्या विश्वासाने करतो. विशेष म्हणजे चिन्ह नसलेल्या मतपत्रिकेवर बरोबर चिन्ह करताना मतदार एकही मतपत्रिका अवैध ठरवत नाही. त्यामुळे उमेदवाराची शाळे- प्रति काम करण्याची क्षमता,त्याची आस्था,वेळ देण्याची मानसिकता आणि लोकसंपर्क यावरच वैयक्तिक मतदान होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे पॅनेल मॅनेजरला विशेष परिश्रम घ्यावे लागतील. मात्र मतदार राजा सुज्ञ आहे,सर्व उमेदवार स्थानिक असल्याने प्रत्येकाची चांगली ओळख आहे. त्यामुळे येणारे संचालक मंडळ संस्थेचे हित जोपासणारे,हुषार मतदार निवडून देतील, अशीच शिक्षण प्रेमींची अपेक्षा आहे..