सावंतवाडी
सोनुर्ली गावचे सुपुत्र मुंबईस्थित उद्योजक हनुमंत विश्राम सोनुर्लेकर (६१) यांचे ठाणे – मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते यातच उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक चळवळीतील व्यक्तिमत्वाच्या आकस्मिक निधनामुळे सोनुर्ली पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.
सोनुर्ली माऊली देवस्थानच्या धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असायचे.
सोनुर्ली व सावंतवाडी येथे शिक्षणानंतर ते उद्योग व्यवसायानिमित्त मुंबई येथे स्थायिक झाले होते. स्वतःच्या गारमेंट व्यवसायात त्यांनी मोठी भरारी घेतली होती. नेहमी हसतमुख असलेले हनुमंत हे दानशूर व हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे शोक व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन विवाहित बहिणी, भावजया, पुतणे पुतण्या, नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा परिषदचे माजी सदस्य कै. नाना सोनुर्लेकर तसेच एसटीचे निवृत्त वाहक कै. चंद्रकांत सोनुर्लेकर यांचे ते बंधु तर सोनुर्ली गावच्या माजी सरपंच अन्नपूर्णा सोनुर्लेकर यांचे ते दीर होत.