5 विरुद्ध 4 अशी रंगत होत भाजपाची बाजी
कणकवली
शिवसेना व भाजप कडून प्रतिष्ठेच्या केल्या गेलेल्या तरंदळे उपसरपंच निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार अर्पिता घाडी यांना धूळ चारत भाजपाचे संदेश सावंत हे बहुमताने विजयी झाले. उपसरपंच संदेश सावंत यांना पाच तर शिवसेने कडून मोर्चेबांधणी करत उपसरपंचपदी नामनिर्देशन सादर केलेल्या अर्पिता घाडी यांना चार मते मिळाली.
संदेश सावंत यांना आनंद डोईफोडे, विवेक परब, सीताराम वीखाळे, संजना राणे त्यांचे स्वतःचे एक अशी पाच मते मिळाली. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या निवडणूकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी केली होती. काही सदस्य ताब्यात ठेवण्यात आल्याची ही चर्चा तालुक्यात सुरु होत्या.
ही निवडणूक प्रतिष्ठेची करून देखील शिवसेनेला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, जाणवली येथील भाजपा पदाधिकारी संदीप सावंत, स्वप्नील चिंदरकर, भाई आंबेलकर, नगरसेवक शिशिर परुळेकर, राजेश फाटक,सत्यवान राणे, सुधीर सावंत, प्रशांत राणे, बबन डोईफोडे, माजी सरपंच जयसिंग नाईक आदी उपस्थित होते.