जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांचा पहाटेचे गुलाबी वर्णन करणारा अप्रतिम लेख.
कोकिळेचा “कुहू कुहू” असा मंजुळ ध्वनी अन पक्षांचा किलबिलाट…कानावर पडताच, पहाट झाल्याची जणू काय आरोळीच झाली अन सूर्याची सोनेरी किरणे आपल्या अंगा खांद्यावर लेवून झाडे, वेली, पाने, फुले किरणांच्या सोनेरी छटांमध्ये न्हाऊन गेली. झाडांच्या…पानांच्या मधून सोनेरी किरणे डोकावू लागली…जणू काय भूवरी नवतरुणी अवतरली अन तिचे यौवन पहायला, आपल्या डोळ्यांत साठवायला किरणेही आसुसलेली होती तशीच…
तळ्याकाठच्या झाडीने….पाण्याचे शुभ्र धवल धुक्याची शाल पांघरली होती….हळुवार वाऱ्याच्या झुळुकेने…..थंडीने गारठलेलं पाणी हवेत वाफा सोडत होतं तशाच वाफा पाण्यावर उठत होत्या. रात्रभर शांत पहुडलेलं पाणी नुकतंच पहाटेच्या आगमनासाठी आतुर झालं होतं…धुक्याचा दुलईतून वाट शोधत पक्षीही शांत विहार करत उजाडणाऱ्या नव्या गुलाबी पहाटेच्या स्वागतासाठी आतुर झाले होते….रात्रीच्या काळोखात आपल्या पंखांवर दवबिंदूंचे तुषार झेलून भिजलेलं ओलं अंग सुकविण्यासाठी काळाकुट्ट पाणपक्षी पंख पसरवून सकाळी येणाऱ्या सूर्याच्या सोनेरी किरणांची चातक पक्षासारखीच वाट पाहत होता…
अंधारलेल्या पहाटेस पाय मोकळे करणारी कितीतरी माणसे धुक्यातून वाट काढत पायाखालच्या रानावरील दवबिंदू तुडवीत मार्ग काढत फिरत होती…तोंडातून निघणाऱ्या वाफा…अंगात असणाऱ्या उष्णतेला हवेतील गारव्याने मारलेली अलगद मिठी न बोलताच सांगून जात होत्या….अंगावर उभा राहणारा काटा….. गर्मी अन गारव्याच्या मिलनाची साक्ष देत उभा होता…
फुलांच्या पाकळ्यांवरील दवबिंदू पाकळ्यांशी गोड बोलत होते…पाकळ्यांच्या मनातील भेद काही क्षण का होईना ते….जीवन असेपर्यंत….. हवेतच खोलत होते.
उमलणाऱ्या कोमल पाकळ्या….भुंग्यांनी कुरतडण्याची भीती बाळगून फुलायचे सोडत नसतात…..तर आनंद देण्यासाठी प्रत्येक क्षणी गोड हसत फुलत असतात…तशाच गोड हसत उमलत…फुलत होत्या.
पक्षांचा चिवचिवाट वाढू लागली तशी पहाटेची सोनेरी किरणे पाण्यावर तरंगू लागली….
परावर्तित होणारी सोनेरी किरणे डोळे दिपवून टाकत होती…जणूकाय सुष्टीने जरिकाठाची साडी नेसावी आणि आपल्या अनन्यसाधारण सौंदर्याने धरणीला भारून टाकावे….तशीच धरणी सजू लागली..
सूर्याच्या तेजाने झाडे वेली पाने फुले चमकू लागली…..
दवबिंदूंचे नाजूक तुषार पानांवरून लटके गळू लागले…लुप्त होऊ लागले…
सोनेरी किरणांनी रूप बदलून चंदेरी प्रकाश पसरला….काळीकुट्ट रात्र मिटून ही गुलाबी पहाट सूर्याची किरणे लेवूनी नव्या दिवसाची….नव्या आशेची….नवं वर्षाच्या नव्या इच्छा घेऊन धरतीवर अवतरली…
©[दिपी]
दीपक पटेकर, सावंतवाडी