वेंगुर्ले
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी गाड्यांवर दगडफेक करण्याचे प्रकार सुरूच आहेत. मालवण आगारातून वेंगुर्ले येथे येणाऱ्या एम. एच.०६ एस. ९५२१ या क्रमांकाच्या एस. टी. बस वर शुक्रवारी सागरी महामार्गावरील तेंडोली-आवेरे बागलाची राय या ठिकाणी चार जणांनी दगडफेक केली. यामध्ये चालकाच्या डोक्याला दुखापत झाली असून गाडीचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी वेतोरे पालकरवाडी येथील एस. टी. चालक संदीप शशिकांत चीचकर वय ४४ याला अटक केली आहे.
मालवण आगारातील एस टी. चालक अनिल गनपत भोगवेकर यांनी निवती पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, आपण मालवण येथून वेंगुर्ले कडे एसटी बस घेऊन जात होतो. बागलाची राई दरम्यान गाडी आली असता रस्त्याला च्या बाजूला उभे असलेले चीचकर व अन्य अनोळखी तिघांनी गाडीच्या चालकाच्या बाजूने दगडफेक केली. यामध्ये खिडकीची काच फोडून आपल्या डोक्याला मार बसला आहे. यावेळी आपण गाडी थांबवली असता हे तेथून पळून जात होते. जातेवेळीही त्यांनी गाडीचे मागील दोन्ही काचेवर दगदफेक करून नुकसान केले. ही घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. या तक्रारीवरून पोलिसांनी भा.दं.वी. कलम 336,337,427,34, सार्वजनिक सम्पत्ती नुकसान अधी कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान निवती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. जी . व्ही. वारंग यांनी गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर आरोपींना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केले असून वेतोरे येथील चीचकर यास ताब्यात घेऊन अटक केली. याप्रकरणी अधिक तपास श्री वारंग करीत आहेत.