You are currently viewing कणकवली बाजारपेठेत थेट रस्त्यावर दुकाने थाटणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी

कणकवली बाजारपेठेत थेट रस्त्यावर दुकाने थाटणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी

नागरिक आणि वाहनचालकांची मागणी

कणकवली

कणकवली बाजारपेठेत दुकानदारांनी दकानाबाहेर थेट रस्त्यावर दुकाने थाटल्याने वाहतुकीला अडथळा होत असून याचा आर्थिक फटका आज सकाळी एका ट्रकचालकाला बसला. थेट रस्त्यावर दुकाने मांडणाऱ्या व्यापाऱ्यांवर नगरपंचायत प्रशासनाने दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिक आणि वाहनचालकांतून होत आहे. काही दुकानदार आपल्या दुकानातील वस्तू थेट रस्त्यावर मांडतात. ग्राहकांना वस्तू दिसावी हा त्यामागचा उद्देश. मात्र दुकानाच्या बाहेर मांडलेल्या वस्तू या वाहतुकीला नेहमीच अडथळा ठरतात. कणकवली बाजारपेठेत दुचाकीपासून ते अगदी ट्रकपर्यंत वाहने येतात. दुतर्फा जेव्हा दुकाने रस्त्यावर मांडलेली असतात तेव्हा वाहनांचा धक्का दुकानाच्या वस्तुंना लागतो आणि नंतर वादावादी सुरू होते. आज सकाळी अशीच घटना कणकवली बाजारपेठेत घडली. रस्त्याच्या दुतर्फा व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थेट रस्त्यावर मांडली आणि ट्रक चा धक्का लागून पिंजर भरलेल्या बॉक्सचे नुकसान झाले. रस्त्यावर दुकाने मांडल्यावर त्यात जर काही नुकसान झाले तरी वाहनचालकांनाच आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. आज सकाळच्या घटनेतही नाहक त्या ट्रक चालकाला हजारांचा आर्थिक फटका बसला. थेट रस्त्यावर दुकाने मांडून वाहतुकीला अडथळा करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिक आणि वाहनचालकांकडून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा