बांदा
भारतीय जनता पक्ष व नारायण सावंत यांच्या माध्यमातून बांदा शहरात आज मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी व वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळू सावंत यांच्या निवासस्थानी करण्यात आला.
शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये सकाळी ९.३० ते १२ या वेळेत शेकडो ग्रामस्थांनी या योजनेचा लाभ घेतला.
यावेळी सरपंच अक्रम खान, उपसभापती शीतल राऊळ, ई श्रम कार्डचे प्रदेश सचिव नारायण सावंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष मंगलदास देसाई, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, श्यामसुंदर मांजरेकर, माजी सैनिक बाबा कदम, माजी सरपंच एस आर सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, रवी पटेकर, ज्ञानेश्वर सावंत, भाजप महिला शहर अध्यक्षा अवंती पंडित, राजा सावंत आदी उपस्थित होते. बाबा कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना अक्रम खान म्हणाले की, बांदा शहरातील प्रत्येक नागरिकाचे ई श्रमिक कार्ड काढण्यात येणार आहे. या योजनेसाठी कोणीही वंचित राहू नये यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागात ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ सर्व लाभार्थ्यांनी घ्यावा. दिवसभरात प्रभाग क्रमांक ३ मध्ये संदेश महाले व ज्ञानेश्वर सावंत यांच्या निवासस्थानी ही योजना राबविण्यात आली.
नारायण सावंत व मंगलदास देसाई यांनी या योजनेची सविस्तर माहिती व भविष्यात होणारे फायदे याबाबत उपस्थितांना माहिती दिली. स्वागत व प्रास्ताविक बाळू सावंत यांनी केले.