सिंधुदुर्ग
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना होणारा कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिक स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यु पाळत आहेत.
जिल्ह्यात ज्या-ज्या ठिकाणी जनता कर्फ्यु असणार तिथे सर्वांनी पक्षभेद विसरून आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी जनता कर्फ्यूला साथ द्यावी अशी मनसेची भूमिका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी या आधीच स्पष्ट केली आहे.
परंतु कणकवलीत शिवसेना नेते संदेश पारकर, शैलेश भोगले आणि मालवणला शिवसेनेचे नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर हे जनता कर्फ्यूला विरोध करत आहेत तर सावंतवाडीत शिवसेना नगरपालिका गटनेत्या अनारोजिन लोबो जनता कर्फ्यु लागु करावा असे म्हणत आहेत. म्हणजेच जिल्ह्यात एका तालुक्यात जनता कर्फ्युचे समर्थन व अन्य तालुक्यात जनता कर्फ्यूचा विरोध अशी दुटप्पी भूमिका सेनेचे पदाधिकारी घेत आहेत.
आज जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा पुर्णपणे खिळखिळी झालेली आहे.सेवा देणारे डॉक्टर,कर्मचारी,नर्स अपुरे आहेत.जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून दोन महिन्यापूर्वी सुरक्षित असलेला सिंधुदुर्ग जिल्हा आता असुरक्षित झाला आहे. लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.आरोग्य यंत्रणेवर ताण येत असून, रुग्णांवर उपचार करताना अडचणी येत आहेत. जिल्ह्यात ऑक्सिजन व व्हेंटिलेटर सारख्या सोयी मिळत नाही. मृतदेहांची हेळसांड होत आहे.अशा अनेक तक्रारी केल्या जात आहेत.
शासन, लोकप्रतिनिधी अपयशी ठरत असताना जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने सत्तेत असलेल्या शिवसेनेने ठोस भूमिका घेणे आवश्यक होते. परंतु दुर्दैवाने केवळ कोव्हिडचे राजकारण करून धन्यता मानणार्या शिवसेनेने जनतेसोबत न राहता अश्या प्रकारची दुटप्पी भूमिका घेणे म्हणजे लोकांची छळवणूक करण्याचा हा प्रकार आहे.
यामुळेच पक्षाचे प्रमुखच मुख्यमंत्री असलेल्या जिल्ह्यातील शिवसेनेने जनतेला अपेक्षित असलेल्या जनता कर्फ्यूबाबत अधिकृत भूमिका काय? ती स्पष्ट करावी अशी मागणी मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे.