You are currently viewing एक होता डोंगर

एक होता डोंगर

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य मनोहर झोरे यांची काव्यरचना

पोरं एकदम आलं
अन् बापाला बोललं
सांगा आहे का खरं
इथं होता एक डोंगर |

म्हणे दुरूनच दिसे
त्याचा हिरवागार माथा
झाडी होती घनदाट
मग का दिसेना ती आता
कशी हरवून गेली
त्याच्या भवतीची हिरवळ
सांगा…….|

मोर नाचे थुई थुई
त्या डोंगराच्या पाशी
फिरे कळप हरणाचा
डोंगराच्या पायथ्याशी
कुठं हरवलं आज
मुक्या जिवाचं त्या घर
सांगा………. |

बापाला भरून आलं
जवळ पोराला घेतलं
हात ठेऊन पाठीला
बाप पोराला बोलला
होत काय अन् कसं
घडलं रे हे सारं
कसं सांगू रे लेकरा
एक होता रे डोंगर |

बाळा काय सांगू तुला
त्या डोंगराची गोष्ट
हि जात माणसाची
सांगू किती आहे दृष्ट
त्याच्या प्रगतीसाठी
सारं रान पोखरलं
कसं सांगू रे लेकरा
एक होता रे डोंगर |

होती त्याच्यावर किती
हिरवळ दाटलेली
झाडापाशी झाडं किती
त्याला वेल भेटलेली
झाडावर बसलेली
चिवचिव करी पाखरं
कसं सांगू………|

रोज सांजच्याला सूर्य
ज्याच्या पाठीमागं लपे
मग सकाळी सकाळी
त्याच्या कुशीतून जागे
आज लपण्या सूर्याला
नाही कुठला आधार
कसं सांगू रे लेकरा
एक होता रे डोंगर |

*मनोहर गोपाळ झोरे*

प्रतिक्रिया व्यक्त करा