जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ सुमती पवार यांची काव्यरचना
मला ही वाटते खूप करावे नवनवीन काही
अनाथांची आई व्हावे मी सिंधू ताई…
मदर तेरेसा व्हावे वाटते नि बाबा आमटे
पतितांच्या मार्गातील करावे दूर सारे काटे…
व्हावे शिवाजी नि तानाजी व्हावे विवेकानंद
सन्मार्गाचा भला लागावा मनास माझ्या छंद
अनुताई मी व्हावे वाटते वि स खांडेकर
ज्ञानपीठ मज मिळो वाटते व्हावे ज्ञानेश्वर…
तुकाराम मी व्हावे वाटते रामदास स्वामी
चरणकमल वंदुनी तयांचे खूप बनावे ज्ञानी
एकनाथांची मी भागवत नामदेवांच्या चिपळ्या
वारकरी मी व्हावे वाटते मिटतील चिंता सगळ्या …
येसूबाई ताराबाई वाटते व्हावे जिजाऊ
जोतिबा मी व्हावे वाटते नि त्यांची साऊ
आंबेडकर मी व्हावे वाटते, वाटते लिहावी घटना
सुधामुर्ती व्हावे वाटते इंम्फोसिसची ललना…
चंद्रावरती जावे वाटते स्पेससूट घालावा
अवकाशातच अलगद माझा देहच तरंगावा
हात मारून अवकाशी मी पक्ष्यांसम विहरावे
अवकाशीचे गुज तुम्हाला येऊन येथ सांगावे …
खूप वाटते काही बाही पण सारे होईल का
जन्म एकटा त्या साठी पण सांगा पहा पुरेल का ?
तुम्हीच सांगा उपाय मजला पुरवा मनिषा माझी
हे सारे जर खरेच घडले … तर मी होईन “गाजी”….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : ७ जानेवारी .२०२२