You are currently viewing जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष आणि विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मोटर सायकल रॅली, स्वच्छता रॅली, विजयदुर्ग किल्ला व समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रम

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष आणि विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मोटर सायकल रॅली, स्वच्छता रॅली, विजयदुर्ग किल्ला व समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रम

सिंधुदुर्गनगरी

 जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पाणी व स्वच्छता मिशन कक्ष आणि विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त रामेश्वर मंदिर ते विजयदुर्ग जेटी मोटरसायकल रॅली, जेटी ते किल्ला स्वच्छता रॅली, विजयदुर्ग किल्ला व समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रम आज राबवण्यात आला. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विनायक ठाकूर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत दीपाली पाटील, रामेश्वर सरपंच विनोद सुके आणि विजयदुर्गचे सरपंच प्रसाद देवधर यांचा प्रमुख सहभाग होता. विजयदुर्गचे ऐतिहासिक महत्व आणि परंपरा येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला कळण्यासाठी निश्चितच या किल्ल्याचे संवर्धन पुरातत्व विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून केले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी यावेळी दिली.

                सकाळी 9 वा. रामेश्वर मंदिर ते विजयदुर्ग जेटीपर्यंत काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व विजयदुर्ग ग्रामपंचायतीचे कर्मचारी सहभागी झाले होते. तर विजयदुर्ग जेटी ते किल्ला स्वच्छता रॅलीमध्ये रामेश्वर हायस्कूल व विजयदुर्ग माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले. यानंतर किल्ल्यामध्ये विजयदुर्ग माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कोविड दक्षता या विषयावर कोरोना वॉरियर्स हे पथनाट्य सादर केले. तर महिला बचत गटाने विजयदुर्ग किल्ला या विषयावरील नाटिका सादर केली.

                यावेळी बोलताना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, विजयदुर्ग किल्ला हा आपल्या इतिहासाचा तसेच परंपरांचा गौरव स्तंभ आहे. या इतिहासाची आणि गौरवशाली परंपरांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठीच आजचा हा कार्यक्रम विजयदुर्ग किल्ल्यावर घेण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे. सर्वांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. सामाजिक अंतराचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

                जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्यासह उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी किल्ल्याची पाहणी केली व उपस्थित गाईडकडून किल्ल्याचा सविस्तर इतिहास जाणून घेतला. किल्ल्याची माहिती पर्यटकांना देणाऱ्या सर्व गाईड्सचा यावेळी प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. गाईड महेंद्र जवकर यांनी उपस्थितांना विजयदुर्ग किल्ल्याची थोडक्यात माहिती दिली.

                यावेळी पंचायत समिती सभापती रवी पाळेकर, जिल्हा परिषद सदस्य  वर्षा पवार, पंचायत समिती सदस्य शुभा कदम, देवगडचे प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसिलदार मारुती कांबळे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विजयदुर्गचे उपसरपंच महेश बिडये आदी उपस्थित होते. विजयदुर्ग माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गुंडु बिर्जे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा