You are currently viewing बांदा पंचक्रोशीत वाढतेय कोरोनाची तिसरी लाट

बांदा पंचक्रोशीत वाढतेय कोरोनाची तिसरी लाट

कोरोना रुग्ण वाढू लागल्याने विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान

सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्यात हॉटस्पॉट बनला होता, त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येतेय म्हटल्यावर जिल्ह्यात काही प्रमाणात भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा कहर अनुभवलेले बरेचजण कोरोनाची भीती आणि प्रशासनाकडून दंड आकारला जाईल म्हणून तरी मास्क वापरताना दिसत आहेत. गर्दीची ठिकाणे, बँक आदी परिसरात खेड्यापाड्यातून आलेले लोकही मास्कचा वापर करत असल्याचे पहायला मिळते.
गेल्या काही दिवसांपासून बांदा पंचक्रोशीतील काही गावांमध्ये ट्रॅव्हलिंग हिस्टरी नसताना देखील कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. अचानक वाढलेल्या थंडीमुळे की इतर कारणांनी हे समजून येत नाही, परंतु अनेकजण खोकला, सर्दी आदींनी त्रस्त आहेत. कोरोनाच्या भीतीने वेळेत डॉक्टर कडे गेलेले काही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने बांद्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचे रुग्ण सापडून येत असतानाच ओमायक्रोन चा रुग्ण मात्र आढळून न आल्याचे जास्त टेन्शनचा विषय बनला नाही, तरीही गेली काही वर्षे माकड तापासारख्या आजारांनी बांदा पंचक्रोशीत काहींचे जीव गेल्याने नागरिक कोरोनाबाबत देखील सतर्क आहेत. येत्या काही दिवसात काजूचा हंगाम जवळ येत आहे, वायंगणी शेती देखील सुरू झाली आहे, त्यातच कोरोनाने डोके वर काढल्याने मास्क वापरून शेतात जाणे,काम करणे अवघड बनत चालले असून शेतीच्या कामासाठी देखील बाहेरील मजूर घेणे अत्यंत धोकादायक वाटू लागले आहे. त्यामुळे ऐन शेतीच्या हंगामात शेतकरी वर्ग मात्र चिंतातूर बनला आहे. गेली काही वर्षे माकडताप बांदा परिसरात थैमान घालत असून आजपर्यंत त्यावर शासन स्तरावरून कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे शेतकरी वर्गास शेतात, बागेत काम करताना मनात भीती घेऊन वावरावे लागत आहे.
कोरोनाच्या भीतीपोटी सरकारने शाळा,कॉलेज बंद केल्याने विद्यार्थ्यांचे देखील अतोनात नुकसान होत आहे. गेली दोन वर्षे विद्यार्थी शाळेत न जाताच पुढच्या वर्गात जात आहेत, त्यामुळे जरी मुलांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले नसले तरी मुलांची शैक्षणिक गुणवत्ता मात्र घसरत चालली आहे. शहरातील मुले ऑनलाईन शिक्षण घेत आहेत, परंतु दोनवेळा तोंडाकडे हात जाताना मुश्किल असणारे आणि कोरोनामुळे नोकरी, धंदे बंद असल्याने घरात असणाऱ्या ग्रामीण भागातील पालकांना मुलांच्या शैक्षणिक तयारीसाठी ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी लागणारे महागडे मोबाईल आणि महिन्याकाठी लागणारे पाच/सहाशे रुपयांचे रिचार्ज म्हणजे “दुष्काळात तेरावा महिना” अशीच परिस्थिती घरामीन भागातील गोरगरीब मुलांच्या पालकांची स्थिती झाली आहे. त्यामुळे सरकार जरी शाळा कॉलेज ऑनलाईन पद्धतीने घेत असेल तरी ग्रामीण भागातील मुलांसाठी तर ते शिक्षण “आगीतून फोफाट्यात पडल्यासारखे” होणार आहे. त्यामुळे शासनाकडून सर्व प्रकारचे निर्बंध लावताना शहरी आणि ग्रामीण भागाबरोबरच ग्रामीण भागातील लोकांच्या आर्थिक परिस्थितीचाही विचार केला जावा, अन्यथा “दोरीच्या सापाला बडवता बडवता साप तसाच राहील आणि काठी मात्र तुटून जाईल”.

प्रतिक्रिया व्यक्त करा