You are currently viewing छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांना कोविड-१९ बाबत मार्गदर्शन

छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांना कोविड-१९ बाबत मार्गदर्शन

जानकीबाई आयुर्वेदिक महाविद्यालयाचे आयोजन

सावंतवाडी

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येथील जानकीबाई आयुर्वेदिक महाविद्यालयाच्यावतीने कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडीच्या संरक्षण शास्त्र तसेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांसाठी कोविड-१९ च्या अनुषंगाने वैयक्तिक स्वच्छता व घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात व्याख्याते डॉ. विकास काटणे, डॉ. राजेंद्र पाटील यांनी सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी, लसीकरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेले गैरसमज, वैयक्तिक स्वच्छता याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनामध्ये वैयक्तिक स्वच्छतेबाबत काळजी घेण्याचा संदर्भात छोट्या छोट्या सूचना केल्या. तर डॉ. काटणे यांनी विद्यार्थ्यांना आहारामधील छोट्या-मोठ्या बदलामुळे प्रकृतीवर होणारे परिणाम याबाबत माहिती दिली.

एनसीसी महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग, एनसीसी घटक कळसुलकर इंग्लिश स्कूल यांच्यावतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एम. पी. मानकर यांनी केले. आभार प्रशालेचे एनसीसी अधिकारी तथा सहाय्यक शिक्षक गोपाळ गवस यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा