सिंधुदुर्ग :
जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट होऊन संसर्ग वाढू लागल्याने जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या सर्व शाळा गुरुवार दिनांक 6 जानेवारी पासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर अधिकचे निर्बंध लावले जाणार आहेत. 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू असल्याने लसीकरण पूर्ण झाल्यावर माध्यमिक शाळा बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तसेच कोविड सेंटर सुरू करण्याच्या सूचनाही तहसीलदाराना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिली.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे मुंबई ,पुणेसह अनेक जिल्ह्यात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही गेल्या चारपाच दिवसात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होऊन कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर एक बैठक घेण्यात आली या बैठकीस शिक्षणाधिकारी मूस्ताक शेख ,उपशिक्षणाधिकारी आंगणे व इतर अधिकारी उपस्थित होते या बैठकीत 6 जानेवारी पासून पहिली ते आठवीच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिली.