कुडाळ
कुडाळ नगरपंचायतीमध्ये चार जागांसाठी एकूण १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज झालेल्या अर्ज छाननीत यातील १६ अर्ज वैध ठरले. तर एक अर्ज अवैध ठरला आहे. त्यामुळे आता ४ जागांसाठी १६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. प्रभाग क्रमांक सतरा साठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आघाडीत एकमत न झाल्याने या ठिकाणी त्यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सभापती सुनील राधाकृष्ण भोगटे हे याठिकाणी इच्छुक होते. तर शिवसेनेतर्फे अमित राणे हे इच्छुक होते. याबाबत दोन्ही बाजूने एकमत न झाल्याने अखेर मैत्रीपूर्ण लढत करण्याचा निर्णय झाला. याला दोन्ही पक्षांच्या वतीने संमती दर्शविण्यात आलीं आहे. दोन्ही उमेदवारांना दोन्ही आपापल्या पक्षाचे एबी फॉर्म जोडण्यात आले आहेत. एकूण १७ पैकी १३ जागांसाठी मतदान झाले आहे.
मात्र उर्वरित चार जागांसाठी १८ रोजी मतदान होणार आहे. कुडाळ नगरपंचायत मध्ये ४ जागांसाठी १७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. प्रभाग क्रमांक १७ मध्ये सर्वात जास्त म्हणजे पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते मात्र भाजपच्या उमेदवार मुक्ती रामचंद्र परब यांचा एबी फॉर्म नसल्याने अवैध ठरविण्यात आला. तर उर्वरित तीन प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. ते सर्व वैध ठरविण्यात आले आहेत. असे एकूण १३ उमेदवारी अर्ज आजच्या उमेदवारी अर्ज छाननीत वैध ठरले.
प्रभाग क्रमांक ३ साठी शिवसेनेतर्फे अश्विनी विठ्ठल पाटील, भारतीय जनता पार्टी तर्फे चांदनी शरद कांबळे तसेच अपक्ष म्हणून नेत्रा नागेश नेमळेकर यांची उमेदवारी अर्ज वैध ठरलेत. प्रभाग क्रमांक १० मध्ये शिवसेनेतर्फे प्रांजल प्रदीप कुडाळकर भाजपतर्फे एडवोकेट रीना राजेश पडते तर काँग्रेसतर्फे अक्षता अनंत खटावकर यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत तर प्रभाग क्रमांक १६ मध्ये शिवसेनेतर्फे किरण चंद्रकांत शिंदे भाजपतर्फे सुधीर अनंत चव्हाण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सहदेव रामचंद्र पावसकर यांचे अर्ज वैध ठरले आणि प्रभाग क्रमांक १७ मध्ये सर्वाधिक पाच उमेदवारी अर्ज दाखल होते मात्र मुक्ती रामचंद्र परब यांचा एबी फॉर्म नसल्याने अवैध ठरल्याने आता शिवसेनेतर्फे अमित विजय राणे, भाजपतर्फे रामचंद्र मनोहर परब राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुनील राधाकृष्ण भोगटे आणि काँग्रेसतर्फे ऋषिकेश रवींद्र कांबळे यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.