सावंतवाडी
येथील उपजिल्हा रुग्णालयाला अद्ययावत व्हेंटिलेटर १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान याबाबतचे निवेदन त्यांनी माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम पाटील यांना दिले आहे.
सावंतवाडी शहराच्या आजूबाजूला बरीच गावे असल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच सिरीयस रुग्णांना गोवा-बांबोळी रुग्णालयावर अवलंबून राहावे लागत आहे. अशावेळी ब-याच रुग्णांचे रुग्णवाहिके अभावी प्राण जात आहेत. सावंतवाडी तालुक्याला व्हेंटिलेटर अॅम्ब्युलन्स साठी ओरोस किंवा देवगडच्या १०८ अॅम्ब्युलन्सची वाट पाहत राहावी लागते. या वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने धोका वाढतो व रुग्ण दगावण्याची शक्यता वाढते. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे तातडीने (ALS) अॅम्ब्युलन्स सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला देण्यात यावी, अशी मागणी श्री. सुर्याजी यांनी केली आहे.