हॉटेल चंदूभुवन मध्ये मॅनेजर म्हणून केले होते काम
सावंतवाडी शहरातील तरुण हॉटेल व्यावसायिक हरेश दिनेश सातार्डेकर (वय ५२) यांचे शनिवारी रात्री निधन झाले. सावंतवाडी शहरात जुनाबाजार परिसरात राहणारे, मूळ सातार्डा येथील रहिवासी असलेले हरेश यांनी हॉटेल व्यावसायिक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती. गेली अनेक वर्षे हरेश सावंतवाडीतील प्रसिद्ध चंदू भुवन हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून जबाबदारी पार पाडत होते. “चंदू भुवन म्हणजे हरेश” अशीच शहरात त्यांची ओळख निर्माण झाली होती.
चंदू भुवन मध्ये आयुष्यातील बराचसा काळ घालवल्यानंतर गेली जवळपास तीन वर्षे सावंतवाडीतील मोती तलावाच्या काठावर सारस्वत बँकेच्या शेजारी छोट्याशा गाळ्यात त्यांनी आपला स्वतःचा हॉटेल व्यवसाय सुरू केला होता. त्यांची पत्नी आणि ते स्वतः हा हॉटेल व्यवसाय यशस्वीपणे सांभाळत होते. अनेक वर्षांचा हॉटेल व्यवसायातील अनुभव असल्याने उत्कृष्ट प्रतीचा नाश्ता त्यांच्याकडे मिळायचा. शहरात चांगली ओळख आणि प्रेमळ, हसतमुख स्वभाव यामुळे त्यांचा ग्राहकवर्ग, मित्रपरिवार देखील मोठा होता.
हरेश यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व एक मुलगी आहे. त्यांच्या निधनानंतर सातार्डा या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.