You are currently viewing मनोरुग्ण महिलेला वन स्टॉप सेंटरचा आधार

मनोरुग्ण महिलेला वन स्टॉप सेंटरचा आधार

सिंधुदुर्गनगरी

 सावंतवाडी रेल्वे स्थानकावर आढळलेल्या मनोरुग्ण महिलेस येथील वन स्टॉप  सेंटर मधील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आठवडाभराच्या देखभालीनंतर रत्नागिरी येथील मनोरुग्णालयात दाखल केले.

                सावंतवाडी रेल्वेस्टेशन येथे दि.२० डिसेंबर रोजी आढळलेल्या अनोळखी महिलेस सावंतवाडी पोलीसांनी सखी वन स्टॉप सेंटर येथे दाखल केले. या महिलेशी खूप वेळ बोलण्याचा प्रयत्न केल्यानंतरही ही महिला बोलायला तयार नव्हती.तसेच जेवण पाणी देण्याचा प्रयत्न केल्यास कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नव्हता.  वन स्टॉप सेंटर च्या कर्मचाऱ्यांनी तिची पिशवी तपासली असता त्यात रेल्वेचे तिकीट आढळून आले व त्यावर एक संपर्क क्रमांक मिळाला.त्या क्रमांकावर संपर्क साधला असता. संपर्क क्रमांक हा पीडितेच्या मुलीचा असल्याचे समजले.मुलीचा म्हणण्याप्रमाणे ही तिची आई असून ती मनोरुग्ण असल्याचे कळले.

                 त्याच दिवशी सायंकाळी ७ च्या दरम्यान महिलेची तब्येत खराब झाल्याने तिला जिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. तिच्या नातेवाईकांना कळविले असता, महिला दि.१७/१२/२०२१ पासून गायब असून त्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यामध्ये हरवल्याची तक्रार नोंदविल्याचे सांगितले. तसेच ती मनोरुग्ण असून त्याबाबत रुग्णालयाचे कागदपत्र व कोर्ट ऑर्डर पाठवून त्यांनी तिला परत नेण्यास नकार दिला.तसेच महिन्याभराने येऊन नेऊ, असे सांगितले. हरवलेली तक्रार असल्याने संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.

                ही महिला काही खात – पित नसल्याने तिला डॉक्टर च्या सल्ल्यानुसार जिल्हा रुग्णालयातच ठेवले.  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव डी.बी. म्हालटकर, विधी सल्लागार श्रीनिधी देशपांडे यांच्या सल्ल्यानुसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राच्या प्रशासक ॲड पुजा काजरेकर, परिचारिका स्नेहा मोरे, योगिता परब, केसवर्कर चैत्राली राऊळ तसेच सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी या महिलेची आठवडाभर दिवस – रात्र देखभाल केली. ७ दिवस उलटून गेल्यानंतरही नातेवाईक, संबंधित पोलीस नेण्यास न आल्याने महिलेस  जिल्हा रुग्णालय, सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने आज सकाळी रत्नागिरी मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − nine =